“महालक्ष्मी सरस हे महिलांच्या आर्थिक क्रांतीचा नवा मार्ग; मुंबईकरांनी या चळवळीला भरभरून प्रतिसाद द्यावा” – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि 2९— “ग्रामीण भागातील महिला आता केवळ सक्षम होत नसून त्या महाराष्ट्राच्या नव्या आर्थिक क्रांतीचे नेतृत्व करत आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ‘लखपती दीदी’ ते ‘ग्लोबल उद्योजिका’ असा हा प्रवास राज्याला समृद्धीकडे नेणारा असून, ही केवळ एक विक्रीची संधी नसून ग्रामीण भगिनींच्या सन्मानाची आणि आत्मविश्वासाची मोठी चळवळ आहे,” असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन २०२६” ०२ मे रोजी बांद्रा कुर्ला संकुल (BKC), मुंबई येथे भव्य स्वरूपात सुरू होत असून १४ मे २०२६ पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास मंत्री मा.श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला यंदा अधिक व्यापक आणि आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. हा उपक्रम ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत असून, महिलांच्या कौशल्याला आणि पारंपरिक ज्ञानाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत आहे. यंदाच्या प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील २३० स्टॉल्ससह इतर राज्यांतील ६६, नाविन्यपूर्ण महिला समूहांचे ६८ आणि महिला शेतकरी उत्पादक गटांचे ३४ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. नाबार्ड, माविम आणि खादी ग्रामोद्योग यांसारख्या विविध शासकीय संस्थांच्या उपस्थितीमुळे हे प्रदर्शन विविधता आणि उद्योजकतेचा एक मोठा उत्सव ठरत आहे.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचे भव्य वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे राज्यातील पारंपरिक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची लज्जत चाखता येईल. हातमाग वस्त्रे, लाकडी हस्तकला, वारली व बंजारा कला, आणि विविध ग्रामीण उत्पादनांची थेट खरेदी करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. यंदा परंपरेसोबतच आधुनिकतेची सांगड घालत एआर फोटोग्राफी, अनामॉर्फिक वॉल आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रदर्शनाची कंटेनर-आधारित भव्य रचना ही महिलांच्या औद्योगिक प्रवासाचे आणि जागतिकीकरणाचे प्रतीक म्हणून उभी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष विश्रांती कक्ष, लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि २५ किलोमीटर परिसरामध्ये मोफत घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या भव्य आयोजनाबाबत बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटी असा विश्वास व्यक्त केला की, “महालक्ष्मी सरस २०२६ हा केवळ उपक्रम नसून महिलांच्या शक्तीवर आधारित महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्याला नवी दिशा देणारा मॉडेल आहे. ग्रामीण महिलांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रामाणिक उद्योगाला अधिक बळ देण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी आणि या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा.”KK/ML/MS