केंद्राकडून सन २६ – २७ साठी ऊसाची आधारभूत किंमत निश्चित
नवी दिल्ली, दि. 5 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस हंगाम 2026-27 (ऑक्टोबर – सप्टेंबर) साठी ऊसाचे वाजवी आणि किफायतशीर दर (एफआरपी) प्रतिक्विंटल 365 रुपये निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे. हा दर 10.25% मूलभूत साखर उतारा गृहीत धरून निश्चित करण्यात आला आहे. 10.25% पेक्षा जास्त उतारा असेल तर प्रत्येक 0.1% उतारा वाढीसाठी प्रतिक्विंटल 3.56 रुपये अतिरिक्त प्रीमियम तसेच उताऱ्यात प्रत्येक 0.1% घट झाल्यास एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 3.56 रुपये कपात करण्याची तरतूद आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 9.5% पेक्षा कमी उतारा असलेल्या साखर कारखान्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी ऊस हंगाम 2026-27 मध्ये ऊसासाठी प्रतिक्विंटल 338.30 रुपये दर मिळेल.
ऊस हंगाम 2026-27 साठी उसाचा उत्पादन खर्च (ए2 + एफएल) प्रतिक्विंटल 182 रुपये इतका आहे. त्याच्या तुलनेत 10.25% साखर उतारा दराने मिळणारा 365 रुपये प्रति क्विंटलचा एफआरपी उत्पादन खर्चापेक्षा 100.5% ने जास्त आहे. ऊस हंगाम 2026-27 साठीचा एफआरपी सध्याच्या ऊस हंगाम 2025-26 पेक्षा 2.81% ने जास्त आहे.
मंजूर केलेला एफआरपी साखर कारखान्यांद्वारे 2026-27 च्या ऊस हंगामात (1 ऑक्टोबर, 2026 पासून सुरू) शेतकऱ्यांकडून ऊस खरेदीसाठी लागू होईल. साखर क्षेत्र हे एक महत्त्वाचे कृषी-आधारित क्षेत्र आहे, जे सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, तसेच प्रत्यक्ष साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 5 लाख कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम करते. याशिवाय, शेतमजूर आणि वाहतूक यांसारख्या विविध पूरक कामांमध्ये काम करणाऱ्यांचाही यात समावेश आहे.
SL/ML/SL