विधानपरिषद निवडणूक अखेर बिनविरोध…
मुंबई दि ३० : राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी आणि एका पोटनिवडणुकीच्या जागेसाठी अशा दहा जागांसाठी होणाऱ्या मतदानात एकूण दहाच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत रंगलेले संघर्ष नाट्य आयत्या वेळी झालेल्या चर्चेनंतर शमल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .
विधान परिषदेतून नऊ सदस्य निवृत्त झाले आणि एका सदस्याने राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवरती पोटनिवडणूक होत आहे . अशा एकूण दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. यावेळी भाजपाकडून सहा, शिवसेना शिंदे गटाकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक आणि महाविकास आघाडी कडून एक अशा दहा उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. याव्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध ठरली आहे.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील असे आत्तापर्यंत जाहीर करण्यात येत होते आणि तेच उमेदवार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या दोघांचाही पाठिंबालाही असे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र काल आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना उद्धव ठाकरे हे उमेदवार असणार नाहीत तर अंबादास दानवे उमेदवार असतील असे सांगितल्यानंतर काँग्रेसने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आपला उमेदवार आपण रिंगणात उतरवू अशी भाषा देखील त्यांनी केली. त्यानंतर ही निवडणूक आता चुरशीची होते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.
मात्र आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते काँग्रेस नेत्यांच्या भेटीला पोहोचले. तिथून एका बाजूने उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूने के. सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करण्यात आली. अखेर 2018 आणि 29 साली होणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी काँग्रेसचा प्राधान्याने विचार केला जाईल असे आश्वासन मिळाल्यावर काँग्रेसने आपला विरोध संपविला.
आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये भाजपाचे सहा ज्यात प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, डॉक्टर संजय भेंडे, एडवोकेट माधवी नाईक आणि विवेक कोल्हे यांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटात आजच प्रवेश केलेल्या बच्चू कडू आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने झीशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली. याशिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांनीदेखील आपली उमेदवारी दाखल केली.
ML/ML/SL