“ममता दीदी हरल्या नाहीत… बंगालमधील लोकशाही जिंकली!”– आमदार प्रसाद लाड
मुंबई, दि ७
२०२६ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल हा केवळ सत्तांतर नसून भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा आहे. हा निकाल म्हणजे जनतेच्या सजगतेचा, मताधिकाराच्या शक्तीचा आणि परिवर्तनासाठीच्या ठाम इच्छाशक्तीचा विजय आहे. त्यामुळे हा पराभव कोणत्या एका व्यक्तीचा नसून दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या व्यवस्थेला जनतेने लोकशाही मार्गाने दिलेले उत्तर आहे, असे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा जनतेतील असंतोष, अपेक्षा आणि बदलाची तीव्र इच्छा दर्शवतो. भ्रष्टाचाराचे आरोप, भरती घोटाळे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, विरोधकांवरील हिंसाचार, भीतीचे वातावरण, तसेच बांगलादेश सीमेलगत घुसखोरी, तस्करी आणि अस्थिरता यामुळे जनतेत अस्वस्थता वाढली होती. महिला सुरक्षेच्या घटनांनीही जनतेचा संताप अधिक तीव्र झाला.
या पार्श्वभूमीवर “बदल” हा केवळ नारा न राहता जनतेच्या जीवनाशी जोडलेला मुद्दा ठरला. बंगालच्या जनतेने दाखवून दिले की लोकशाही ही सामान्य माणसाच्या हातातील सर्वात मोठी ताकद आहे “झालमुरीने किमया केली” असेच म्हणावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
या विजयामागे भाजपा संघटनेचे बूथ स्तरावरील काटेकोर काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास, राष्ट्रीय सुरक्षा व स्थैर्याच्या संदेशाचा प्रभाव महत्त्वाचा ठरला. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत कमळ फुलणे हा विचारसरणीचा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा निकाल केवळ बंगालपुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणावरही दूरगामी परिणाम करेल. जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतात अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे.
बंगालच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार, असे भाजपा आमदार व विधान परिषदेचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांनी सांगितले.KK/ML/MS