केईएम रूग्णालयावरील प्राथमिक उपचारांचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना
मुंबई, दि १७
राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधांसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (HMIS) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रणाली अंतर्गत उपलब्ध होणाऱया माहिती आणि डॅशबोर्डचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सहज आणि तंत्रज्ञानस्नेही स्वरुपात उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा रुग्णांना कमी कालावधीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘एच. एम. आय. एस.’ सेवेशी उत्तमरित्या संलग्न करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी आजच्या बैठकीदरम्यान दिल्या. सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय येथील विविध वैद्यकीय कक्षांच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज (दिनांक १७ एप्रिल २०२६) भेट दिली. रुग्णालय पुनर्विकास, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी करणे यासारख्या विषयांच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते. केईएम रूग्णालयातील नोंदणी कक्ष, अतिदक्षता विभाग, पुरूष सर्वसाधारण कक्ष, अपघात विभाग याठिकाणी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी स्थळभेट दिली. तसेच रुग्णालयातील विविध विभागांचे सुरू असलेले प्रकल्प, विविध वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा विकास, रुग्णालयातील नवीन इमारतींचा विकास, रुग्णशय्या संख्यावाढ आणि विविध विभागअंतर्गत वैद्यकीय सुविधांच्या क्षमतावाढीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
रुग्णांच्या नोंदणी कक्षाच्या ठिकाणी ‘एच. एम. आय. एस.’ प्रणालीची कार्यपद्धती महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी जाणून घेतली. तसेच वैद्यकीय तपासण्या, रुग्णांची माहिती, वैद्यकीय अहवाल यासारखा तपशील ‘एच. एम. आय. एस.’ प्रणालीमध्ये कशा पद्धतीने संलग्न करण्यात आला आहे, या बाबीचा आढावादेखील आयुक्त श्रीमती भिडे यांनी घेतला. त्यानंतर पुरूष रुग्ण कक्षाच्या ठिकाणी भेट देऊन रूग्ण नोंदणी, रुग्णालयातील कक्षात देण्यात येणारे उपचार, वैद्यकीय अहवाल, रूग्णांचा तपशील आदी बाबींची ‘एच. एम. आय. एस.’ प्रणाली अंतर्गत होणारी नोंद याचाही तपशील आयुक्त भिडे यांनी जाणून घेतला. अपघात विभाग, अतिदक्षता विभाग याठिकाणी देण्यात येणाऱया सुविधांबाबतची माहिती त्यांनी या भेटीदरम्यान घेतली. सद्यस्थितीला एचएमआयएस प्रणालीच्या अंमलबजावणीअंतर्गत येणारी आव्हानांवर मात करून ही यंत्रणा अधिकाधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. एचआयएमएस प्रणालीअंतर्गत रुग्णाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.
रूग्णालय क्षमतावाढीच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, यादृष्टाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. विविध विभागांचे शस्त्रक्रिया कक्ष संकूल (इन्टिग्रेटेड ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स), रक्तचाचणी प्रयोगशाळा या एकाच ठिकाणी असल्याने रुग्णांची वेळेची बचत होईल. त्यादृष्टीने नव्याने उभारण्यात येणाऱया इमारतींमध्ये नियोजन करण्यात यावे. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी भूमिगत कक्ष निर्माण करता येतील का, याचाही आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ महानगरपालिकेच्या माध्यमातून तसेच (सी.एस.आर.) अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. तसेच रुग्णालय पुनर्विकासअंतर्गत उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करत रुग्णांना आणि आरोग्य यंत्रणेला होईल, यादृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना यासारख्या योजनांचा लाभ रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांना करून द्यावा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर इतर योजनांसाठी (एम्पॅनेलमेंट) वैद्यकीय उपचारांसाठी शुल्क आकारणी करावी. त्याचा फायदा रुग्णालयाच्या महसूल वाढीसाठी कसा होईल, यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिल्या.
केईएम रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा ताण पाहता वैद्यकीय सुविधा नजीकच्या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात याव्यात. केईएम रुग्णालयाने नजीकच्या दवाखान्यांच्या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठीचे रुग्ण पाठवावेत, त्यामुळे प्राथमिक सेवेवर येणारा ताण कमी होईल, अशा सूचना श्रीमती अश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. आरोग्य सेवांसाठी उपनगरीय रुग्णालये, प्रसुतीगृह आणि दवाखाने याठिकाणी अधिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच अत्यावश्यक सुविधांसाठी प्रमुख रूग्णालये सेवा देण्यासाठी सक्षम व्हावी, याअनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणेमध्ये चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रुग्णालयांवर येणारा ताण पाहता रुग्ण हस्तांतरीत करण्यासाठी लिंकेज सिस्टिम पुनर्जिवित करावी, अशा सूचनाही आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.JS/ML/MS