आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा
मुंबई, दि. 24 : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठी सोय करून ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच उन्हाळी सुट्टीकरिता चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून ही स्पेशल मेमू कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणाऱ्या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेऱ्या धावणार आहेत. जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ही गाडी साप्ताहिक स्वरूपाची असून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवशी धावेल. १ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध राहणार आहे. गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा स्पेशल चिपळूणवरून दुपारी १५.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.१० वाजता दिवा स्थानकात पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण स्पेशल रात्री २३.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. ८ डब्यांच्या या गाडीमुळे खेड, माणगाव, रोहा आणि पेण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा आधार मिळणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असल्याने ऐनवेळी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरू शकते.
SL/ML/SL