वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर झाडांना ‘संजीवनी’पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

 वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर झाडांना ‘संजीवनी’पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

मुंबई, दि १५: वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वृक्षसंपदेचे संरक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून सार्वजनिक ठिकाणांवरील झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. झाडांची मुळे कोरडी पडून ती कमकुवत होऊ नयेत तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना टाळाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महानगरपालिकेकडून पिण्यासाठी अयोग्य; मात्र झाडांसाठी उपयुक्त असलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने झाडांवर ताण वाढत आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या ठिसूळ होणे, सुकणे किंवा झाडांची जमिनीवरील पकड कमी होण्याचा धोका निर्माण होत असल्याचे वृक्षतज्ज्ञांनी सांगितले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागातील केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ आणि जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. उद्यान विभागाकडूनही विविध भागांतील झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे आणि झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे, ही कामे सातत्याने सुरू आहेत.
दरम्यान, खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. उन्हाळ्यात झाडांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून मुंबईकरांनी आपल्या परिसरातील झाडांना वेळोवेळी पाणी घालावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *