संविधानिक विशेषाधिकार वापरून ममता बॅनर्जी सरकार बरखास्त
कोलकाता, दि. ७ : सपशेल पराभवानंतरही मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास स्पष्टपणे नकार देणाऱ्या ममता बॅनर्जींचे सरकार अखेर राज्यपालांनी संविधानिक विशेषाधिकार वापरून बरखास्त केले. तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचा निकाल हा जनादेश नसून कटकारस्थान असल्याचा आरोप केला होता. “आमचा पराभव जनतेमुळे नाही, तर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांमुळे झाला आहे,” असा दावा त्यांनी केला होता. “जवळपास 100 जागांवर जनादेश लुटण्यात आला. मतमोजणी जाणीवपूर्वक संथ करण्यात आली. आम्हाला हरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा वापरण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला. आपण हरलेलो नाही, त्यामुळे लोकभवनात जाऊन राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पहिल्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. 9 मे रोजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SL/ML/SL