विद्यार्थीनीने १००० दुर्मिळ वृक्षबिया गोळा करून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.
वाशीम दि २८ : पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास, बदलते ऋतुचक्र आणि वाढते तापमान या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन एस.एम.सी. इंग्लिश स्कूल, वाशीम येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी अशोक तडस हिने आगळावेगळा उपक्रम राबवत तब्बल १००० विविध व दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन केले आहे. केवळ १२ वर्षांच्या वयात ज्ञानेश्वरीने हरित सेनेच्या उपक्रमातून प्रेरणा घेत हा छंद जोपासला. शहरीकरण व वृक्षतोडीमुळे अनेक औषधी व उपयुक्त वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची जाणीव तिला झाली. त्यामुळे तिने विविध भागांतून बिया गोळा करून त्यांचे स्वतंत्र संच तयार केले.
शाळेच्या प्राचार्या मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला. संकलित बियांपैकी काही बिया सामाजिक वनीकरण विभागाला लागवडीसाठी देण्यात येणार असून उर्वरित बियांचा वापर शाळेतील बॉटनिकल गार्डनसाठी केला जाणार आहे. ज्ञानेश्वरीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून तिचा हा प्रयत्न पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत आहे.ML/ML/MS