आषाढी वारीच्या पालखी मार्ग सुविधेत महत्त्वाचे बदल
मुंबई, दि. २४ : पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देहू, आळंदी व सासवड येथून निघणाऱ्या संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे व सुविधा यांचा आढावा घेतला. “पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक सोहळा असून रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना उत्तम सुविधा द्याव्यात.” असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
मुख्य निर्णय व बदल
देहू मार्ग: ईनामदार वाडा परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन आदेश. देहू कॅन्टोन्मेंटमधील खराब रस्त्याची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत. आकुर्डी मुक्कामासाठी जागा व रस्ता-मेट्रो कामे पालखीपूर्वी पूर्ण करणे.
लोणी काळभोर मुक्काम: जिल्हा परिषदेमार्फत जर्मन हँगर, पाणी टँकर व स्वच्छता व्यवस्था गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात.
नीरा नदी: पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याचे आदेश.
संत सोपानदेव पालखी: पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठा व स्वच्छतेचे अधिक नियोजन.
आळंदी: भक्ती सोपान पुलाची उंची वाढविण्याबाबत चर्चा. दर्शनबारीसाठी कायमस्वरूपी जागा. ७०० मीटर रस्त्यापैकी १०० मीटर रुंदीकरण शिल्लक, लवकर पूर्ण होणार. दर्शनबारी परिसरात १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार.
दिवे घाट: वारीदरम्यान बॅरेकेटिंग व विजेची सोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत.
आरोग्य सुविधा: संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर संस्थानांना प्रत्येकी स्वतंत्र रुग्णवाहिका.
सासवड: भुजबळ हॉटेल परिसरातील खड्डा भरण्याचे काम प्रगतिपथावर.
सुरक्षितता: वाहतूक व्यवस्थापनासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती.
SL/ML/SL