पश्चिम उपनगरांमधील नालेस्वच्छतेची कामे प्रगतिपथावर
अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा
मुंबई, दि १५
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी एच पूर्व विभाग, एच पश्चिम विभाग, के उत्तर आणि के दक्षिण विभागात सुरु असलेल्या नाले स्वच्छता कामांची आज (दिनांक १५ एप्रिल २०२६) पाहणी केली.
मोगरा नाला, वाकोला नाला, कृष्णा नगर नाला, अंधेरी भूयारी मार्ग, एसएनडीटी नाला या मोठ्या नाल्यांसह वांद्रे येथील बाजार नाला, गरवारे नाला, अॅपेक्स नाला, येथे प्रत्यक्ष भेट देत श्री. शर्मा यांनी नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.
नाल्यातील तरंगता कचरा तसेच गाळ तातडीने हटवावा. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नालेस्वच्छतेचे काम १०० टक्के पूर्ण होईल, याची खबरदारी घ्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत समन्वय साधून त्यांना नालेस्वच्छतेबाबत वेळोवेळी अवगत करावे, असे निर्देश श्री. शर्मा यांनी महानगरपालिका अधिका-यांना दिले.
स्थानिक नगरसेवक तथा बाजार व उद्यान समिती अध्यक्ष श्रीमती हेतल गाला, नगरसेवक श्री. चिंतामणी निवते, नगरसेवक श्री. राजा रेहबर खान, नगरसेवक श्री. रितेश राय, नगरसेवक श्रीमती रोहिणी कांबळे, नगरसेवक श्रीमती अंजली सावंत, सहायक आयुक्त श्री. दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त श्री. महेश पाटील, सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला, सहायक आयुक्त श्रीमती मृदुला अंडे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.JS/ML/MS