‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली, दि. ३ : लोकसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सर्वात गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अत्यंत जहाल शब्दांत सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारात देशाचे हित गहाण ठेवल्याचा दावा त्यांनी केला. “या करारामुळे पंतप्रधानांनी देशातील कष्टकऱ्यांचा घाम, रक्ताचे पाणी करून केलेली मेहनत आणि पर्यायाने संपूर्ण देशच अमेरिकेच्या स्वाधीन केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. केवळ काही विशिष्ट तडजोडींसाठी देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाशी तडजोड केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रतिमेवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी सध्या प्रचंड भीतीखाली आहेत. ज्या शक्तींनी आणि ज्या जाहिरातबाजीने त्यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण केली होती, त्याच शक्ती आता ती प्रतिमा खंडित करण्याचे काम करत आहेत.” त्यांची ही भीती त्यांच्या निर्णयांतून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही गांधी यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्याचा संबंध थेट पंतप्रधानांशी जोडला. त्यांच्या मते अमेरिकेत अदानींवर सुरू असलेला खटला हा केवळ एका उद्योजकाविरुद्ध नसून, तो प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींवरील खटला आहे.
आर्थिक संरचना: आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पंतप्रधानांच्या ‘आर्थिक संरचनेला’ (Financial Structure) लक्ष्य केले जात आहे, ज्याचा पाया अदानींच्या व्यवसायांवर उभा आहे, असा दावा देखील त्यांनी केला.
राहुल गांधींच्या या विधानांमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी हे आरोप फेटाळून लावत राहुल गांधींनी देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन केल्याचा प्रतिवाद केला. मात्र, राहुल गांधींनी आपला पवित्रा कायम ठेवत सरकारला या आर्थिक व्यवहारांवर स्पष्टीकरण देण्याचे आव्हान दिले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अत्यंत धक्कादायक विधान करताना ‘एपस्टीन फाइल्स’ (Epstein Files) या प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांच्या दाव्यानुसार, या फाइल्समधील बराचसा संवेदनशील मजकूर अमेरिकेने अद्याप सार्वजनिक केलेला नाही. या अप्रकाशित माहितीचा वापर करून अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींवर दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
सभागृहातील आपल्या भाषणात अडथळे आणले गेल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय संसदीय इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्याला त्यांचे म्हणणे मांडण्यापासून रोखले जात आहे, असा दावा त्यांनी केला. ही केवळ तांत्रिक बाब नसून लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याचे सांगत, जनतेने या गंभीर स्थितीवर विचार करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले.
SL/ML/SL