महिलेची झेप — घरच्या शेतीतल्या हळद,मसाला उद्योगाकडे

 महिलेची झेप — घरच्या शेतीतल्या हळद,मसाला उद्योगाकडे

जालना, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिग्री नसेल तरी चालेल पण मनात जिदद आणि आत्मविश्वास, अफाट परिश्रम करायची तयारी असेल तर कितीही मोठे शिखर आपण पार करू शकतो.अनुभवाच्या बळावर व्यवसाय उभा केलेल्या मीनल रामेश्वर जैद या उद्योजिकेचा हा यशस्वी जिवन प्रवास असाच बोलका आहे.

ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुंटुंब आले,आणि शेतकरी कुटुंब म्हटलं की, महिलांना घरकाम व चुल आणि मुल एवढेच साम्राज्य असते हे वास्तव आहे.पण परिस्थितीवर मात करून मसाला उद्योगात स्वतःच अस्तित्व निर्माण केलेल्या मीनल रामेश्वर जैद यांची कहाणी मोठी रंजक आहे.

लग्नापूर्वी एकत्र कुंटूंब असल्यामुळे दर रोजचा स्वैपाक आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असल्यामुळे मीनल जैद यांना स्वयपाक करण्याची सवय लागली.रोजच्या सवयीमुळे त्यांना स्वैपाकात निपुणता तर आलीच, शिवाय त्यांनी बनवलेल्या स्वयंपाकाला स्वादिष्ट -चव येत असल्याने त्यांच्या सुगरण पणाचे कौतुक पण व्हायला लागले.

रोज सांयकाळी सर्व परिवार एकत्र जेवण करत असल्याने संध्याकाळी मीनल ताईंच्या स्वैपाकाचे हमखास कौतुक व्ह्यायचेच व्हायचे .तुझ्या हाताला फार स्वादिष्ट ‘चव’ आहे त्यामुळे सगळेच बोटं चाटून खायचो त्यामुळे मीनल ताई दररोज जेवणात नव नविन पदार्थ बनवायच्या आणि कुटुंबाला खाऊ घालायच्या.

प्रत्येकाला जसं वाटत की आपण खूप शिकले पाहीजे आणि पुढे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहीजे तसेच मीनल ताईंच्या मनात राहून राहून विचार यायचे, त्यांना सुद्धा वाटायचे की आपणही भरपूर शिकावं आणि आपलं स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे .
१० वी पास झाल्या आणि मीनल ताईंचे लग्न झाले.

लग्न झाल्यावर काही दिवसांनी त्यांचे पती रामेश्वर जैद हे ठिबक,तुषार संचच्या व्यवसायासाठी जालना येथे स्थाईक झाले.
रीतिरिवाज नुसार पतीने कमावणे आणि पत्नीने घर संसार सांभाळावा या पद्धतीने त्यांचा संसार सुखाचा चालू होता.याच काळात कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला,देशात लॉक डाऊन लागले. त्यावेळेस जैद कुटुंबीय घरीच होते.त्यांच्या शेतात दीड एकर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केलेली होती.

लॉक डाऊनमुळे जैद् कुटुंबीयांतील सदस्यांनीच काही मिरची तोडणी करून जवळपासच्या गावात विक्री केली.पण मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे मीनल ताई यांनी कुटुंबातील सदस्यांना स्वस्तात मिरची विकण्यापेक्षा ती निवडून तिची प्रतवारी करून दळून विकण्याची आयडिया दिली आणि तोच मीनल ताईंच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि शेती सांभाळता सांभाळता त्या उद्योगकडे वळल्या.

घरच्यानिही त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरले आणि कांडप मशीन मधून मिरची दळून ५०० ग्रॅम म्हणजे अर्धा किलो,१ किलोच्या पॅकेट मध्ये भरून २५०/३०० रुपये किलो भावाने आजूबाजूच्या गावातील विकले.जवळपास साडे ९ क्विंटल मिरचीचे तिखट लॉक डाऊन च्या काळात बनवून विकले गेले आणि मीनल ताईंचा सुगरणीचा हात लागल्याने म्हणा,मिरची पावडर ग्राहकांच्या पसंतीला उतरली.या बरोबर सगळ्यात मोठा फायदा झाला तो विक्री करण्याचा. आपोआप त्यांना विक्रीचे कौशल्य शिकता आले, व ग्राहकही पक्के झाले.

कोरोना काळात हॉटेल व्यवसाय बंद झाला होता. कोरोनाची लाट कमी झाल्यावर बऱ्याच दिवसांपासून मैत्रिणीना भेटायचं म्हणून त्यांनी त्यांच्या घरीच शेजारील मैत्रिणींना जेवायला बोलावलं,आणि जेवणाचा मेनू होता पुडाच्या वड्या. त्या खाल्ल्या नंतर त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना पुडाच्या वड्या करून विक्रीची कल्पना दिली.

आज जालना शहरातील सर्वच डॉकटर, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड हे आवडीने मीनल ताईंकडून पुडाच्या वड्या विकत घेतात.
मीनलताईंचे पती रामेश्र्वर जैद यांचा ठिबकचा व्यवसाय आहे त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गेले असता त्यांना तिथल्या बाजार पेठेत हळदीची माहिती मिळाली.त्यांनी येताना वसमत येथून हळद आणली आणि मिरची, मिरची पावडर सोबत मीनल ताईंनी हळद विक्री पण चालू केली.

त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांकडूनच मिरची आणि हळद मीनल ताई विकत घेऊ लागल्याने खात्रीशीर कच्चा माल मिळू लागला.हळद आणि मिरची विक्री करता करता हा व्यवसाय करणे वाटते तितके सोपेही नाही आणि तो उभा करण्यासाठी अफाट मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील असे त्यांच्या लक्षात आले. तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतःचा ब्रँड असणेही तितकेच गरजेचे आहे हे ही त्यांच्या लक्षात आले.

आपल्या देशातील लोकसंख्या खूप मोठी आहे. म्हणजेच खाणारी तोंडे ही जास्त आणि खाणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने आपण चांगल्या प्रतीची मिरची पावडर,हळद,या सोबतच स्वतःचा ब्रँड तयार करून मे.एम.आर.जे. इंडस्ट्रीज प्रा.ली.नावाने कंपनी स्थापन केली आणि टेस्टी स्टार या नावाचा ब्रँड बाजारात आणला.

नुसती मिर्ची व हळद नाही तर सोबतीला काळामसाला, कांदा लसूण मसाला,मटन मसाला,चिकन मसाला, पावभाजी मसाला,सांबार मसाला यांची शृंखला बाजारात उतरवली आहे.
आत्तापर्यंत मीनल ताईंच्या कंपनीतून २५ क्विंटल मिरची,१०क्विंटल हळद २० क्विंटल पेक्षा जास्त मसाले तयार करून विकले गेले आहेत.हे सर्व मसाले जालना जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गेलेले आहेत.

एवढ्यावरच न थांबता मीनल ताईंच्या मसाल्यांनी परराज्यात व देशांच्या बाहेर ग्राहकांची पसंती पटकावली आहे.दुबई,ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका,अमेरिकेत त्यांची सर्व डिजिटल मार्केटिंग चालते.
त्यांच्याव्यवसायाच्या कक्षा वाढवण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधून त्यांना ३० लाख ५२ हजाराचे कर्ज मिळाले आहे.

मीनल ताईंनी आपल्या व्यवसायात ६ महिलांना रोजगार दिलेला असून सध्या जागेच्या अभावी शेतकऱ्यांकडून मिरची, हळद खरेदी करून आपल्या रेसिपी नुसार मसाले बनवण्यासाठी दुसऱ्या कंपनी कडून दळून घेत आहेत.मिरची पावडर, हळद व मसाला पॅकिंग सध्या जालन्याच्या नवीन मोंढ्यात असलेल्या जागेत व घरीच केले जात आहे.

औद्योगिक वसाहतीत त्यांना अद्याप जागा उपलब्ध न झाल्याने कांडप मशिनरी साठी कंपनीकडे आगाऊ भरणा करूनही त्या मशीन त्यांनी अद्याप आणल्या नाही.पण त्यामुळे त्यांच्या व्यवसायात कुठली बाधा आली नसून विक्री सुरू आहे.मीनल ताई वाट पहात आहेत त्या औद्योगिक वसाहतीत मिळणाऱ्या जागेचा.
घरातील कुटुंबासाठी स्वैपाक करता करता बनवलेला सुग्रास मसाला आणि कोरोनाच्या काळात शेतातील मिरचीने त्यांना दिलेला व्यवसायाचा मार्ग आज मीनल ताईंनी यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आणला आहे.

महिन्यकाठी लाख सव्वा लाखाची उलाढाल मीनल ताई करतात.
त्यांच्या या प्रवासातून महिलांना घरच्या घरी करण्यासारखं खूप काही आहे.फक्त करण्याची जिद्द आणि त्याला हवी परिश्रमाची जोड.

ML/KA/SL

12 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *