राज्यात लसीकरणाला सरूवात; लसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा प्रारंभ केल्यांनतर मुंबई शहरात महापालिकेच्यावतीने लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज कांदिवली पश्चिम येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात सुरू असलेल्या कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

राज्यातील लसीकरणाचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कोरोनायोध्दा असलेले पालिका कर्मचारी, रूग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात मोफत लसीकरण मोहिम आजपासून सुरू करण्यात आली असुन महापालिकेकडून उत्तम सोय करण्यात आली असल्‍याचे दरेकर यांनी सांगितले.

रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि सहाय्यक आयुक्त कुराडे यांनी एक चांगली यंत्रणा राबवली आहे. तसेच लसीकरण रूग्णालयात तपासणी केंद्र, नोंदणी केंद्र, प्रतिक्षा कक्ष अशा सर्व ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, असे रूग्णालयाला भेट देतांना दरेकर म्हणाले. त्यांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल सर्व व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांचे त्‍यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

या लसीकरणामुळे मंबईकर जनतेच्या मनातली भीती दूर होऊन आता पुन्हा आत्मविश्वास निर्माण होण्‍यास मदत होईल. त्यामुळे आता विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होईल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आमदार भाई गिरकर, मंडळ अध्यक्ष नगरसेवक बाळा तावडे, नगरसेविका प्रियांका मोरे, महापालिका सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक प्रतिमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Tag- Vaccination-Public-life-back-to-normal-Darekar

ML/KA/DSR/16 JANUARY 2021