बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास उशीर केल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन
बदलापूरच्या आदर्श शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटत आहेत. गेल्या आठ तासांपासून हजारो नागरिक रेल्वे स्टेशन तसेच आदर्श शाळेबाहेर आंदोलन करत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून उशीर केला गेला, असा आरोप केला जातो आहे. दरम्यान, याप्रकरणी आता राज्य सरकारने पहिली कारवाई केली असून तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. सुरुवातीला कारवाई करण्यात तसेच गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.