आयआयटी प्रवेशाबाबत विद्यार्थ्याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

  • आग्र्याच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याच्या आयआयटी बॉम्बे मधील प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
  • ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे या विद्यार्थ्याला बीटेकची जागा गमवावी लागली होती.
  •  न्या.संजय कौल, दिनेश माहेश्वरी आणि हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने त्याचा प्रवेश नियमित केला

 

मुंबई-आग्रा, दि. 9 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यामुळे आग्र्याच्या सिद्धान्त बत्रा या विद्यार्थ्याला आयआयटी बॉम्बे मधील बीटेक प्रवेशाला मुकावे लागले होते. याविषयी त्याने अपील दाखल केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.संजय कौल, दिनेश माहेश्वरी आणि हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने, त्याच्या नियमित प्रवेशावर शिक्कामोर्तब केल्याने या १८ वर्षीय विद्यार्थ्याला दिलासा मिळाला आहे.

तात्पुरता प्रवेश मिळाला होता-

अंतरिम आदेशाचे पालन करीत सिद्धान्तला गेल्या महिन्यात आयआयटीत प्रवेश मिळाल्याची माहिती त्याचे वकील प्रह्लाद परांजपे यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र हा प्रवेश तात्पुरता असल्याचे सांगत, जागेवरून दूर होण्याचा पर्याय सिध्दान्तने स्वतःच निवडला असल्याचे आयआयटीने सांगितले.

इतर विद्यार्थीही सीट अलॉटमेंट प्रक्रियेतून स्वतःहून दूर झाले होते आणि त्यांच्यापैकीच एकाने आता कलकत्ता उच्च न्यायालयात अशाच प्रकारची याचिका दाखल केली असल्याचे आयआयटीच्या वकिलांनी सांगितले. ‘आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे एक उदाहरण म्हणून बघितले जाऊ नये’ अशी विनंतीही त्यांनी केली.

नेमके काय घडले होते?

आग्र्याच्या सिध्दान्त बत्रा याने IIT-JEE (Advanced) या परीक्षेत ऑक्टोबर २०२०मध्ये भारतभरातून २७० वा क्रमांक पटकावला. त्याला आयआयटी बॉम्बे मध्ये विद्युत अभियांत्रिकीमध्ये बीटेक साठी सीटदेखील मिळाली. मात्र एका लहानशा चुकीमुळे त्याची पंचाईत झाली. १८ ऑक्टोबरला सीट वाटपाची पहिली फेरी त्याने पूर्ण केली. ३१ ऑक्टोबरला अपडेट बघताना त्याला एक लिंक मिळाली- ‘जागा निश्चिती आणि पुढील फेरीतून बाहेर’ असे त्यावर लिहिले होते. आपली जागा आधीच पक्की झाल्याचा विचार करीत त्याने त्यावर क्लिक केले.

मात्र, विद्युत अभियांत्रिकीत प्रवेश मिळालेल्यांची यादी बघताना १० नोव्हेंबरला त्याचे नाव यादीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. मात्र, ‘सिध्दान्तला तसे करण्याचा अधिकार नाही. प्रवेशासाठी आता त्याला पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी लागेल’ असे आयआयटीच्या स्पष्ट केले होते. त्याविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

 

Tag- supreme-court-confirms-regularize-admission-of-student

DSR/KA/DSR/ 9 JANUARY 2021