सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक योजना

पालघर, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विद्यार्थी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार आणि व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे अशा पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणं अवघड होत आहे. असे विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात कायम राहावेत आणि शैक्षणिक संधीपासून ते वंचित राहू नयेत, तसेच त्यांच्या पालकांवरचा आर्थिक बोजा काही प्रमाणात सुसह्य व्हावा, म्हणून सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीनं दानशूर व्यक्तींना आवाहन करुन गरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेण्यासाठी विनंती केली आहे.

संस्थेचे सदस्य जनार्दन पुरुषोत्तम दांडेकर उर्फ भाऊ दांडेकर यांनी बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., आय.टी., सी.एस., बीएमएस, बॅफ आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 20 गरीब आणि गरजू मुलांचं एक लक्ष पन्नास हजार इतक्या रक्कमेचे शैक्षणिक शुल्क भरुन त्या मुलांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी सुध्दा भाऊ दांडेकर यांनी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीला पाच लक्ष रुपयांची भरीव देणगी दिली होती.

या संस्थेचे अध्यक्ष अॅड जी. डी. तिवारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून अनेक दानशूर व्यक्ती विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क भरण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी दत्तक योजनेसाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या देणगीदारांचं अभिनंदन केलं आहे.

हा दत्तक योजनेचा प्रवाह आणखी पुढे जाईल आणि गरीब, गरजू विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त  लाभ मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केला आहे.

 

Tag- Student-Adoption-Scheme-at-Sonopant-Dandekar-College

ML/KA/DSR/13 JANUARY 2021