#काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आश्वासनानंतरही पक्षांतर्गत निवडणु्कीचा ठिकाणा नाही- कपिल सिब्बल

नवी दिल्ली, दि.18(एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस पक्षातील कलह संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहित. पक्षाच्या 23 असंतुष्ट नेत्यांच्या पत्रानंतर कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेले वादळ शमविण्यासाठीच्या सोनिया गांधी यांच्या प्रयत्नांचा परिणामही संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण उपस्थित केले आहे. एका वृत्तानुसार कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांशी खुली चर्चा करुन अंतर्गत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले होते. जवळपास एक महिना उलटल्यानंतरही अद्याप या निवडणुका कधी होणार हे स्पष्ट झालेले नाही.

राहुल गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर सिब्बल थेट काही बोलले नाहीत. राहुल यांच्या अध्यक्ष होण्यावर सिब्बल म्हणाले की, जेव्हा हा मुद्दा चर्चेला येईल तेव्हा हे पाहिले जाईल. सध्या कोणत्याही आधाराशिवाय सुरु असलेल्या चर्चेला ते उत्तर देणार नाहित. राहुल यांच्या पुनरागमनामुळे पक्षात फरक पडण्याच्या प्रश्नावर सिब्बल यांनी सांगितले की मला त्याबद्दल माहिती नाही. ते म्हणाले की पक्षात घटनेच्या प्रक्रियांचे पालन कशाप्रकारे केले जात आहे यावर सर्वकाही अवलंबुन आहे. यात काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या लोकांशी चर्चाही खुप महत्त्वपूर्ण आहे.

गेल्या 6 वर्षात लोकसभेसह विविध राज्यांमध्ये पक्षाच्या पराभवाला सामोरे जाणार्‍या कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात जोरदार बदल घडवून आणणे, जबाबदारी निश्चित करणे, नियुक्ती प्रक्रिया मजबूत करणे आणि पराभवाचे चिंतन करणे आदी मागण्या केल्या होत्या. या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस कार्यकारिणी समितीचे अनेक सदस्य, विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री यांचा समावेश होता. या नेत्यांनी पक्षातून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली होती. यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोनिया गांधी यांनी पक्षाच्या असंतुष्ट नेत्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता.

Tag-Sonia Gandhi/Internal Elections/Kapil Sibal
PL/KA/PL/18 JAN 2021