वरळीत लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीवरून ‘जी-दक्षिण’च्या शिवसेना नगरसेवकांचा सभात्याग

वरळीत लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या मागणीवरून 'जी-दक्षिण'च्या शिवसेना नगरसेवकांचा सभात्याग

मुंबई दि .५ (एमएमसी न्युज नेटवर्क):- मुंबईतील जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी जी दक्षिण विभागात वरळी डोम येथे कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करा अशी आग्रही मागणी करत आज सभात्याग केला.  ही मागणी मंजूर होत नसल्याने शिवसेना नगरसेवक नाराज झाले होते व ही नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला.

जी- दक्षिण हा विभाग पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात येतो. या विभागात शरद उघडे सहाय्यक आयुक्त असून शरद उघडे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. वरळीतील विकासकामे आणि स्थानिक कामे करताना शरद उघडे यांचा आदित्य ठाकरेंशी नेहमी संवाद-संपर्क असतो.

“वरळी डोम येथे कोव्हिड लसीकरण केंद्र सुरु करा”, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र ही मागणी मंजूर झाली नव्हती. त्यामुळे शिवसेना नगरसेवक नाराज झाले होते.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी शरद उघडे कार्यालयात उशिरा पोहोचले त्यामुळे जी साऊथमधील शिवसेना नगरसेवकांनी त्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदलोनात महापौर किशोरी पेडणेकर सहभागी झाल्या होत्या. मात्र आदित्य ठाकरेंना शिवसेना नगरसेवकांचे हे आंदोलन रुचले नव्हते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या सर्व नगरसेवकांकडून माफीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आता जी दक्षिण प्रभाग समितीतील शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला आहे. यावर आदित्य ठाकरे काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

SW/KA/DSR/5 MARCH 2021