समृद्धी महामार्ग शिर्डीहून पुढे सरकला मुंबईकडे, लवकरच उद्घाटन

 समृद्धी महामार्ग शिर्डीहून पुढे सरकला मुंबईकडे, लवकरच उद्घाटन

मुंबई दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २६ मे २०२३ रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्याशी थेट व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र. ११,१२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. या टप्याच्या उद्‌घाटनानंतर ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे.

या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.
या टप्यात अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ गावातून लांबी ११.१४१ कि.मी. नाशिक जिल्हयातील एकूण ६८.०३६ कि.मी. लांबी पैकी सिन्नर तालुक्यातील एकूण २६ गावातून ६०.९६९ कि.मी. व इगतपूरी तालुक्यातील ०५ गावातील ७.०६७ कि.मी लांबीचा समावेश आहे. त्यामध्ये पॅकेज – ११अंतर्गत कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, पॅकेज – १२ अंतर्गत गोदे ता. सिन्नर, जि. नाशिक व पॅकेज- १३अंतर्गत एस.एम.बी.टी. मेडिकल कॉलेज, भरवीर, ता. इगतपूरी, जि. नाशिक या इंटरचेंजचा समावेश आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २० २२ रोजी पार पडले. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी फक्त पाच तासातच कापणे शक्य झाले आहे. पाच महिन्यांत लाखो वाहनधारकांनी समृध्दी महामार्गाचा वापर केला आहे.

समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी समृध्दी केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृध्दीमुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला बूस्ट मिळणार आहे.

राज्याच्या दरडोई उत्पन्नात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार लाभला आहे. अहमदनगर जिल्हा साखरेचे कोठार आहे. कृषी दृष्टया संपन्न जिल्हा आहे. दळण-वळण साधनांअभावी जिल्ह्यातील काही भाग विकासापासून मागे राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग शिर्डी परिसर व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.

जिल्ह्याचा समृध्दी महामागापर्यंत पोहचण्यासाठी वेगवान संपर्क उपलब्ध असणार आहे. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उद्योग, दूध व्यवसाय, भाजीपाला, फळे-फुले पिकविणारे शेतकरी व व्यावसायिकांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे.

पर्यटनवाढीलाही चालना, कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार

समृध्दी महामार्गामुळे शिर्डी, शनि शिंगणापूर, ज्ञानेश्वर मंदीर (नेवासा), देवगड आदी पर्यटन स्थळे इतर जिल्ह्यांच्या नजीक येणार आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने ही रस्ता वरदान ठरणार आहे. त्यामुळे सहाजिकच शिर्डीतील भाविकांची संख्या वाढून रोजगाराला चालना मिळणार आहे. कोपरगांव तालुक्यातील धोत्रे व राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. नियोजनबद्ध विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये असतील एका कृषी समृद्धी केंद्रात ३० हजार थेट तर ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नवनगरांच्या माध्यमातून भविष्यात १५ ते २० लाख नवीन रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.

ML/KA/SL

24 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *