मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन अखेर मंत्रिमंडळाच्या बाहेर

 मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन अखेर मंत्रिमंडळाच्या बाहेर

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांचे सहकारी सत्येंद्र जैन यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला असून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हा राजीनामा स्विकारला आहे.

दरम्यान सिसोदिया यांनी अटकेपासून दिलाशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला तसेच हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळं आता काही काळ त्यांना सीबीआयच्या कोठडीतच रहावं लागणार आहे.

अबकारी कर घोटाळा प्रकरणी सिसोदिया यांना रविवारी सीबीआयनं अटक केली त्यानंतर त्यांना स्थानिक कोर्टानं पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. यानंतर त्यांच्या वकिलांनी या अटकेविरोधात तसेच सीबीआयच्या काम करण्याच्या पद्धतीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्या. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर मनीष सिसोदिया यांची बाजू मांडली. यावेळी खंडपीठानं त्यांना दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. थेट सुप्रीम कोर्टात येणं ही चांगली आणि योग्य परंपरा नाही, असंही खंडपीठानं म्हटलं.

गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या अगोदर दिल्लीत ७२० दारूची दुकाने होती. त्यापैकी २६० खासगी दुकाने होती. मात्र, नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

SL/KA/SL

28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *