पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मधून करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण सुरू

पुणे, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया मधून आता करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एकूण सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले. त्यापैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी रवाना होणार आहे. या विमानतळावरून रवाना होणाऱ्या ८ उड्डाणांपैकी २ मालवाहतूक उड्डाणे असून यातील एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर साठी तर दुसरे कोलकता आणि गुवाहाटी येथे जाण्यासाठी निघणार आहे.

इन्स्टिटयूटच्या परिसरातून रवाना होण्यापूर्वी या कंटेनरची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने आनंद साजरा केला.

 

Tag-Pune-covishield-distribution-start

ML/KA/DSR/ 12 JANUARY 2021