ठाणे शहरात 16 ते 30 मार्च पर्यंत मनाई आदेश

ठाणे शहरात 16 ते 30 मार्च पर्यंत मनाई आदेश

ठाणे दि.17( एम एमसी न्युज नेटवर्क):- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 16 ते 30 मार्च पर्यंत मनाई आदेश देण्यात आले आहेत.

1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. 2) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. 3) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. 4) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. 5) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. 6) सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे. 7) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देणे इ. कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

खालील व्यक्तींना मनाई आदेश लागू राहणार नाहीत-

जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे; लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दि.16 मार्च 2021 रोजी 00.01 वाजल्यापासून दि.30 मार्च 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

 

Prohibition orders have been issued in Thane city from March 16 to 30. This order has been issued under Section 37 (1) and (3) of the Maharashtra Police Act, 1951 to maintain public order and safety within the limits of Thane Police Commissionerate.

SW/KA/DSR/17 MARCH 2021