‘आर.टी.ई.’ नुसार खासगी शाळांमध्ये ६ हजार ४६३ जागा, मोफत शाळा प्रवेशास सुरुवात

‘आर. टी. ई.’ नुसार खासगी शाळांमध्ये ६ हजार ४६३ जागा 'शिक्षणाचा अधिकार कायदा’ अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात

मुंबई दि. ५ (एम एमसी न्युज नेटवर्क):- ‘शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९’ मधील ‘कलम १२ (१) (सी)’ (Right to Education Act-2009) अंतर्गत महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी ३५२ पात्र खासगी विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित कोटय़ातून ६ हजार ४६३ जागा उपलब्ध आहेत. पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिनांक ०३ ते २१ मार्च, २०२१ या कालावधीत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) या संकेतस्थळावरुन किंवा education.maharashtra.gov.in (www नाही) या ‘सरल’च्या वेबसाईट मधील ‘विद्यार्थी’ (Student) या टॅबमधील RTE पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता मुंबई क्षेत्रात ४१ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी पालकांनी संकेतस्थळावरील Help Desk या विकल्पावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून सदर मदत केंद्रांची यादी पहावी. सदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जे पालक स्वतःहून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन व Moblile App द्वारे अर्ज करु शकतात, त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी तसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेटी द्याव्यात.
ज्या बालकांनी यापूर्वी आर. टी. ई. २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल.
महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, प्रवेशासाठी लागणा-या सविस्तर माहितीसाठी महापालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

SW/KA/DSR/5 MARCH 2021