
पालघर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास आज जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय पालघर आणि वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात वरूण इंडस्ट्रीज या चार केंद्रांवर 400 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
पालघर ग्रामीण रुग्णालयात आज जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी तसेच इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 17 हजार 411 लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठी लसीच्या 19 हजार 500 मात्रा जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत.
Tag- Palghar-covid-vaccination
ML/KA/DSR/16 JANUARY 2021