केंद्राकडून बफर साठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात

 केंद्राकडून बफर साठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टोमॅटोच्या प्रचंड वाढलेल्या दरानंतर येत्या काळात ओढवू शकणाऱ्या कांद्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच सावध होत आता बफर स्टॉकमधील कांदा विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा ही भारतीयांच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाची भाजी असून कांद्याच्या टंचाईमुळे सरकारला डळमळीत झाल्याची उदाहरणेही याआधी घडली आहेत. अतिरिक्त पावसाने कांदा पिकाचे झालेले नुकसान झाले आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास उशीर लागणार असल्याने सावध भूमिका घेत सरकार या वर्षी साठा केलेल्या 3.00 लाख मेट्रिक टन कांद्याची विक्री करणार आहे.

बफरसाठ्यातील कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी काल नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाच्या (NCCF) व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली आणि या कांद्याची विक्री करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती या देशपातळीवरील किमतींच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ज्या ठिकाणी मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत किमतीत वाढ होण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे त्या ठिकाणी ई-ऑक्शन च्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कांद्याची किरकोळ विक्री करण्याचे ठरवण्यात आले.

ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दर आणि उपलब्धतेच्या परिस्थितीनुसार त्याचे प्रमाण आणि विक्री करण्याची गती देखील ठरवली जाईल. बाजारांमधल्या विक्री व्यतिरिक्त, राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळांच्या विक्री केंद्रांमधून कांद्याची विक्री करता यावी यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

कांद्याच्या दरामधील अस्थिरता रोखण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा ठेवत असते. दरवर्षी रब्बी कांदे खरेदी करून बफर साठा निर्माण केला जातो आणि तो कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो. कांद्याच्या या बफर साठ्याने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

SL/KA/SL

11 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *