Moody’s कडून अदानी समूहासाठी सात कंपन्यांना Negative Rating
मुंबई, दि २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अल्पावधीतच देशातील मोठमोठ्या उद्योगांमध्ये जम बसवणाऱ्या अदानी समूहाला आता सर्व बाजूंनी समस्यांनी ग्रासले आहे. गेल्या वर्षी हिंडेनबर्ग अहवालातून थोडक्यात वाचलेल्या अदानींवर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून लाचखोरीचा आरोप ठेवून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भारतीय बाजार नियामक सेबीकडूनही अदानी ग्रुपच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता पतमानांकन संस्था मुडीजने अदाणी समूहाच्या सात कंपन्यांचे रेटिंग कमी केले आहे. ब्लुमबर्गने दिलेल्या बातमीनुसार, मुडीजने अदाणी एंटप्राइजेस, अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन एनर्जी यांच्यासह सात कंपन्यांचे रेटिंग कमी करून त्यांना नकारात्मक शेरा दिला आहे.
मूडीज संस्थेने नकारात्मक शेरा दिलेल्या अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये अदाणी एंटप्राइजेस, अदाणी एनर्जी, अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदाणी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्र लिमिटेड आणि अदाणी आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रर्मिनल या कंपन्यांचे मानांकन घटविले असून त्यांना नकारात्मक शेरा दिला आहे.
याआधी स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) या पतमानांकन संस्थेनेही अदाणी कंपनीचे मानांकन कमी केले होते. एस अँड पीने अदाणी पोर्ट्स, अदाणी ग्रीन यांच्यासह तीन कंपन्यांचे मानांकन उणे केले होते. पतमानांकन संस्थांकडून ‘रेटिंग’ देताना A, B, C सारखी मूळाक्षरांचा श्रेणीरूपात वापर केला जातो. त्यातदेखील उणे आणि अधिक दर्शविले जाते. एस अँड पीने अदाणी कंपनीला BBB-Minus’ या कनिष्ठ श्रेणीतील मानांकन दिले होते.
अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) उद्याोगपती गौतम अदानी आणि सागर अदानी यांना लाचखोरीप्रकरणी समन्स बजावले आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर (२,२०० कोटी रुपये) लाचेपोटी दिल्याचा अदानी यांच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने गौतम अदानी, सागर अदानी यांच्यासह अन्य सहा जणांवर लाचखोरीचा आरोप ठेवला आहे. याबाबत आता अमेरिकेकडून पुढे काय निर्णय घेतला जातो हे समजणे महत्त्वाचे ठरणार आहे.
SL/ML/SL
26 Nov. 2024