#नासाने तयार केला आकार बदलणारा रोव्हर

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक असा रोव्हर तयार केला आहे जो स्वत:चा आकार बदलू शकतो. तो अगदी हॉलिवूड चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स मधील गाड्यांसारखा आहे. दिसायला तर तो चार चाकांच्या रोव्हरसारखा दिसतो परंतु त्याचे भाग वेगळे होतात. जाऊन आपले काम करतात आणि परत येऊन आणि पुन्हा चार चाकी रोव्हर होतात. त्याला मंगळावर पाठवण्याची नासाची योजना आहे. सध्या त्याची चाचणी मोजावे वाळवंटात घेण्यात येत आहे.

या रोव्हरचे नाव ड्यूअ‍ॅक्सल आहे. हे ड्युअल अ‍ॅक्सलचे छोटे नाव आहे. या रोव्हरमध्ये दोन चाकी रोव्हर्सची जोडी आहे. दोन्ही एका मुख्य भागाच्या दोन बाजूंनी जोडलेले आहेत. पूर्णपणे जोडलेल्या स्थितीत तो चारचाकी रोव्हरसारखे दिसतो परंतु त्याचे दोन चाकी दोन्ही भाग वेगवेगळ्या दिशेला जाऊन शोधकार्य करु शकतात. ड्यूअ‍ॅक्सल मुख्य भागापासून जरुर वेगळा होतो परंतु त्यात एक लांब टेथर म्हणजेच तार लावलेली आहे, जी त्याला कुठेही जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी मदत करते. म्हणजेच, जर मुख्य भाग एखाद्या टेकडीवर असेल तर त्याचे दोन्ही रोव्हर्स एकाचवेळी टेकडीच्या खाली आणि वर जाऊ शकतात. काम पूर्ण झाल्यावर, मुख्य भाग दोन्ही रोव्हर्सना मागे खेचेल.

टेथर हा एक प्रकारचा अँकर आहे ज्याच्यामुळे ड्यूअ‍ॅक्सल वेगळा होऊन कुठेही अडकून पडणार नाही, खराब होणार नाही किंवा त्याचे नुकसान होणार नाही. नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने (जेपीएल) मोजावे वाळवंटात या रोव्हरची चाचणी घेतली आहे. हे वाळवंट मंगळाच्या पृष्ठभागासारखे आहे. याठिकाणी सरळसोट पर्वत, टोकदार दगड, तीव्र उतार, खोल दर्‍या आदी आहेत. याठिकाणी चाचणी घेतल्यानंतर रोव्हरची योग्य तपासणी होते. जेपीएलचे रोबोटिक्स अभियंता इस्सा नेसनॅस यांनी सांगितले की, ड्यूअ‍ॅक्सलने मोजावे वाळवंटात जे काम केले ते आजपर्यंत कोणत्याही रोव्हरने केले नाही. तो कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर जाण्यास तयार आहे. कुठेही चढू शकतो, खाली उतरू शकतो. छायाचित्रे घेऊ शकतो, नकाशे बनवू शकतो. हा अगदी ट्रान्सफॉर्मरसारखा कार्य करतो.

इस्सा यांनी सांगितले की आपण त्याला चंद्र, मंगळ किंवा इतर कोणत्याही ग्रहाच्या खडकाळ मार्गावर उतरवू शकतो. तो जवळजवळ उभी चढण देखील पार करू शकतो. चाके असलेल्या दोन्ही भागांना स्वतंत्रपणे अ‍ॅक्सल म्हणतात. जेव्हा अ‍ॅक्सल कुठेही तपासणी करतो तेव्हा मुख्य भाग स्वतःला जमिनीशी जोडून घेतो जेणेकरुन अ‍ॅक्सल त्याला खेचु नये. अ‍ॅक्सल हा एक स्वयंचालित यंत्रमानव आहे, जो एका टेथरच्या माध्यमातून आपल्या मुख्य भागाशी जोडलेला राहील. आपले काम संपवल्यानंतर अ‍ॅक्सल परत येईल आणि त्याच्या मूळ भागाशी जोडला जाईल. असा अ‍ॅक्सल बनवल्यामुळे आता रोव्हरमध्ये यंत्रमानवी हाताची गरज संपुष्टात आली आहे. यामुळे रोव्हरचे वजनही कमी होईल आणि तो रॉकेटमध्ये जागाही कमी व्यापेल.

ड्यूअ‍ॅक्सलची जमिनीवरील चाचणी तर यशस्वी झाली आहे परंतु आता त्याला, ज्याठिकाणी काम करायचे आहे अशा आपल्या अंतराळ स्थानकाची प्रतिक्षा आहे. म्हणजेच त्या ग्रहाची ज्यावर जाऊन शोधकार्य करायचे आहे. ड्यूअ‍ॅक्सल रोव्हरबद्दल नासामध्ये खूप उत्साह दिसून येत आहे. कारण हा रोव्हर फ्लिप देखील होऊ शकतो. म्हणजेच, चढत असलेला रोव्हर परत येऊ शकतो तेही संतुलन न गमावता. ड्यूअ‍ॅक्सलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खड्ड्यात देखील जाऊ शकतो. आपल्या मार्गात येणार्‍या गोष्टी पाहून मार्ग बदलू शकतो. त्यामध्ये असलेले कॅमेरे मार्ग दाखविण्यासाठी आणि नकाशा तयार करण्यासाठी मदत करतात. त्याच वेळी, अशी काही यंत्रे अशी आहेत जी माती आणि पृष्ठभागामध्ये असलेल्या धातुंची तपासणी करु शकतात.

Tag-NASA/Rover/Transformer/Mars
PL/KA/PL/14 JAN 2021