अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

मुंबई दि .२३( एमएमसी न्युज नेटवर्क):
मुंब्रा येथुन फूस लावून पळवून नेलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील झांशीतून सुखरूप सुटका केली आहे .
मुंब्रा कौसा येथील फिर्यादी xxx यांच्या अल्पवयीन (१४ वर्षीय) मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून तिला आईवडीलांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याबाबत गुरुवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
या गुन्ह्यातील अल्पवयीन अपहृत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखा, घटक -१ चे पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते .
पथकातील पोलीस हवालदार आबुतालीब शेख यांना माहिती मिळाली की , अपहृत मुलगी ही फिरोजपुर एक्सप्रेस गाडी क्र. ०२१३७ या ट्रेनने दिल्लीला चालली आहे. तसेच तिला फूस लावून पळवून नेणारा इसम हा त्या मुलीला दिल्लीत भेटणार आहे. पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांनी ती माहिती झांशी जी.आर.पी.एफ. रेल्वे पोलीस ठाणे इन्चार्ज सुनिलकुमार सिंग यांना दिली व अपहत मुलीचा गाडीमध्ये शोध घेऊन तिला ताब्यात घेणेबाबत कळविण्यात आले .
ठाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड व पथक वरिष्ठांच्या परवानगीने झांशी येथे रवाना करण्यात आले. झांशी रेल्वे पोलीस ठाण्याचे इंन्चार्ज सुनिलकुमार सिंग व त्यांच्या पथकाने फिरोजपुर एक्सप्रेस ट्रेन झांशी रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर त्या गाडीची तपासणी करून अपहृत मुलीस ताब्यात घेतले गेले. त्यानंतर झाशी येथे दाखल झालेल्या पोलीस पथकाकडे तिला सुखरूप सुपूर्द करण्यात आले. पुढील तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.

tags- minorgirl-abduction-rescue-mumbra-thane-crimebranch

SW/KA/DSR/23 JANUARY 2021