दूध दरवाढी संदर्भात शनिवारी विधानभवनात बैठक
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रलंबित असलेल्या दूध दरवाढी संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक येत्या शनिवारी २९ जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणे अपेक्षित आहे.
या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्तांनी सांगितले.
ML/ML/SL
27 June 2024