या कंपनीच्या मार्केट कॅपने प्रथमच ओलांडला 1 लाख कोटींचा टप्पा
मुंबई,दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पवन ऊर्जा क्षेत्रातील विख्यात कंपनी सुझलॉन एनर्जीने आज विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलाने प्रथमच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. व्यवहारादरम्यान सुझलॉनचे शेअर्स त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 3 टक्क्यांहून अधिक वाढले.
भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध केवळ 98 कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. आता या प्रतिष्ठित क्लबमध्ये सामील होणारी सुझलॉन एनर्जी ही 99 वी कंपनी बनली आहे. गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या 12 महिन्यांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांहून अधिक मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी सुझलॉन एनर्जीने संजय घोडावत ग्रुप कंपनी रेनोम एनर्जी सर्व्हिसेसचा 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार केला असल्याचे सांगितले होते. रेनोम एनर्जी ही देशातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस प्रदाता आहे.
रेनोम एनर्जी 7 राज्यांमध्ये व्यवसाय करते आणि त्यांना 14 वेगवेगळ्या उत्पादकांकडून टर्बाइनची देखभाल करण्याचा अनुभव आहे. हे संपादन दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी 400 कोटी रुपये देऊन लगेच 51 टक्के भागभांडवल खरेदी करेल, जेणेकरून कंपनीचे नियंत्रण तिच्यावर येईल. त्यानंतर 18 महिन्यांत 25 टक्के अधिक हिस्सा 260 कोटी रुपयांना खरेदी केला जाईल.
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेने सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सवर ओव्हरवेट रेटिंग कायम ठेवले आहे आणि प्रति शेअर 73.4 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. आजच्या वाढीसह सुझलॉनने हे लक्ष्य ओलांडले आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेसच्या अधिग्रहणामुळे सुझलॉनला मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस क्षेत्रात धोरणात्मक प्रवेश मिळेल.जेएम फायनान्शिअलने सुझलॉनच्या शेअर्सवर आपले खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे.
SL/ ML/ SL
9 August 2024