भवतालाशी नाते जोडले तर पर्यावरण रक्षण आपोआपच
आज जागतिक पर्यावरण दिवस. आपल्या सभोवार आपल्याला वेढून टाकणाऱ्या आणि आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव पर्यावरणात होतो. खरे पाहता, ‘मीही पर्यावरणाचाच एक भाग आहे, माझे या साऱ्या भवतालाशी नाते आहे’ हा भाव बाळगून जगत राहिल्यास, मुद्दाम पर्यावरण जपण्याची गरज पडणारच नाही- कारण आपण आपल्या घराची, कुटुंबाची काळजी घेतो तशीच पर्यावरणाची काळजी घेतली जाईल. पण… हा ‘पण’च अनेक ठिकाणी मनुष्यस्वभाव अधोरेखित करतो. ‘माझी स्वतःची अन् तीही आजच्यापुरती गरज भागली की झाले – इतरांची आणि उद्याची पर्वा आहे कोणाला?’ या विचाराने- खरेतर अविचाराने जगत राहताना, आपण पर्यावरणाची किती हेळसांड करतो, साधनसंपत्तीचा वारेमाप उपसा कसा करतो, सुखाचे मापदंड उपभोगाभोवतीच कसे अविवेकाने बेतून घेतो – याचे आपल्याला भानच राहत नाही.
पिढ्यानपिढ्या असेच चालू राहिल्याने आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाने या प्रक्रियेचा वेग वाढवल्याने, पर्यावरण दिवस पाळून समस्त मानवजातीला वर्षातून एकदा (तरी) भानावर आणण्याची वेळ येऊन ठेपली!
यावर्षी पर्यावरण दिनाची संकल्पना ‘भूमीची पुनर्स्थापना, वाळवंटीकरणास प्रतिबंध, आणि अवर्षणासमोर टिकाव धरण्याची क्षमतानिर्मिती’ अशी आहे. काही वर्षांपूर्वीची मध्यवर्ती संकल्पना वाळवंटीकरणाभोवती केंद्रित होती. तेव्हा या समस्येकडे लक्ष वेधून घेतले होते, परंतु त्यावर पुरेसे काम झाले नाही म्हणून पुन्हा त्याचा अंतर्भाव करावा लागला, हे उघड आहे.
आशिया-प्रशांत (Asia Pacific) क्षेत्र हे समृद्ध जैवविविधतेने नटलेले आहे. यात वाळवंटापासून ते सदा हरित वनांपर्यंतच्या अनेकविध परिसंस्था आहेत. तथापि, नजीकच्या भूतकाळातील मानवी व्यवहारांमुळे येथे भूमी-उपयोजनात (land use) जी स्थित्यंतरे घडत गेली, त्यामुळे ठिकठिकाणचे जैववैविध्य धोक्यात येत चालले आहे. यामागे लोकसंख्यावाढ, अतिरेकी उत्पादनासाठी प्रचंड शेती, निर्वनीकरण, शहरीकरणाचा रेटा, औद्योगिकीकरण- अशी अनेक कारणे आहेत. या साऱ्यांमुळे भूमी उपयोजन बदलते, प्रदूषण आणि कचऱ्याचे प्रमाण वाढत जाते, मृदेचे आरोग्य बिघडत जाते. निरोगी मृदेत कार्बनचे प्रचंड साठे असतात. ते जर मुक्त झाले तर तापमानवाढीस कारणीभूत ठरतात.
आणखी एक पैलू आहे. जगभराचा विचार करता, दर पाच सेकंदांत एका फूटबॉल-मैदानाएवढ्या मृदेची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी किती काळ जावा लागतो, हे पाहिले म्हणजे या क्षरणाचे गांभीर्य समजते. मृदेचा वरचा तीन सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी १,००० वर्षांची गुंतवणूक निसर्ग करत असतो. यास्तव भूमी उपयोजनाचा सुदृढ विचार करणे अगत्याचे ठरते. म्हणून भूमी पुनर्स्थापना (land restoration) हा विषय यावर्षी मध्यवर्ती ठेवला आहे.
तीच गोष्ट पाण्याची. मानवी व्यवहारांमुळे जलप्रवाह बदलणे, जलप्रदूषण, जलस्रोतांचा अतिरेकी उपसा अशा अनेक समस्या जन्माला येऊन वाढत चालल्या आहेत. यामुळे पर्जन्यमानात बदल, पर्जन्यचक्रात बदल, भूजलपातळी खालावणे, महापूर, अवर्षणे आदी वेगवेगळ्या संकटांची तीव्रता वाढतू आहे. शिवाय जलजीवांना धोका उत्पन्न होऊन त्या जैवविविधतेसमोरही आह्वान उभे राहते आहे. जलसंस्थांवर सर्व प्रकारे ताण येतो आहे. जमिनीवर आणि जमिनीखाली पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामुळे वाळवंटीकरणाचा वेग वाढत चालला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी वेगवान योजना आवश्यक आहे. यासाठी हाही विषय मध्यवर्ती संकल्पना समाविष्ट करण्यात आला आहे.
हवामानबदलाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असताना पीकपद्धतीवर त्याचा परिणाम अपरिहार्य आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळण्यासाठी शेती आणि पिके हवामान संकटातही तग धरून राहणे अत्यावश्यक आहे. यासाठी बदलत्या हवामानात उगवू शकणारी, कमी पाण्यावर जगणारी आणि तरीही पोषक असणारी धान्ये शोधून काढणे, त्यांचा प्रसार करणे आणि ती पिकवणे गरजेचे आहे. त्याबरोबरच मानवी जीवन अशा पद्धतीने बेतले पाहिजे की कमीत कमी पाण्यातही लोकांना चांगले जगता आले पाहिजे, जेणेकरून पाण्याची उपलब्धता कमी होत गेल्यावर, काही वंचित देशांना किंवा मानवसमूहांना जगणे अशक्य होणार नाही.
खरे पाहता, या मध्यवर्ती संकल्पनेचा मूलभूत विचार भारत फार प्राचीन काळापासून करत आला आहे आणि LiFE या पर्यावरणस्नेही जीवनमानाच्या चळवळीच्या माध्यमातून भारताने साऱ्या जगासमोर हा विचार मांडला आहे. आपले जीवन आपले दैनंदिन आचरण, आपल्या सवयी, आपले जीवन असे हवे की जेणेकरून पर्यावरणावर ताण येणार नाही, आपल्यामुळे इतर सजीवांचे जगणे असह्य होणार नाही. एका अर्थी, ‘हे विश्वचि माझे घर’ हा ज्ञानोबामाऊलींचा संदेश किंवा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे भारतीय मूल्य आपण आपल्या आचरणातून जगासमोर ठेवले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल.
– जाई वैशंपायन