पिझ्झा खाण्याचे शौकिन असाल तर जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): सध्याच्या काळात युवा वर्गात पिझ्झा खूपच लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. वाढदिवसाला होणाऱ्या पार्ट्यांपासून वीकेंडला होणाऱ्या पार्ट्यांमध्ये लोक पिझ्झा आवर्जून मागवत असतात. काही लोक तर खूपच जास्त प्रमाणात पिझ्झा खात असतात आणि ही बाब आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आरोग्यविषयक सल्लेः लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पिझ्झा चविष्ट असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत हे देखील लक्षात घेतले पाहिजे. केवळ घरीच नव्हे तर अगदी कार्यालयातही पिझ्झा मागवला जातो. पण पिझ्झा जास्त प्रमाणात खाणाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्रीच्या वेळी पिझ्झा खाऊ नये

पिझ्झामध्ये उष्मांक (कॅलरीज) आणि मेदाचे (फॅट) प्रमाण खूप जास्त असते मात्र शरीराला आवश्यक असलेल्या दैनंदिन पोषक घटकांचा अभाव असतो. तो पचवण्यासाठी शरीराला बराच वेळ लागत असल्याने रात्रीच्या वेळी पिझ्झा खाल्यास अजीर्ण (ऍसिडिटी) होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना आधीपासूनच अजीर्ण होण्याची समस्या आहे त्यांनी तर हा पदार्थ अजिबात खाता कामा नये.

हृदयासाठी हानिकारक

पिझ्झामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकाराची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो, यात चिकन घातल्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणखी वाढते. त्यामुळे हृदयविकाराची समस्या असलेल्या लोकांनी यापासून दूर राहिले पाहिजे.

वजनात वाढ होते

खूप मोठ्या साईझच्या पिझ्झाची ऑर्डर देण्याकडे लोकांचा कल असतो. खूपच चविष्ट असल्याने पोट भरेपर्यंत पिझ्झा खाल्ला जातो आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

मधुमेहींसाठी धोकादायक

पिझ्झाच्या एका स्लाईसमध्येही खूप जास्त प्रमाणात कर्बोदके असतात, त्यामुळे प्रदीर्घ काळ पिझ्झा खाण्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

 

Tag- health-tips-know-pizza’s-harmful-effects

DSR/KA/DSR/13 JANUARY 2021