कोविड लसीचा पहिला साठा मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दाखल

ठाणे / मुंबई, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कोविड-19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा बुधवारी पहाटे 4.30 वा. ठाणेे जिल्ह्यात, तर 5.30 वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्‍ह्यात दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे.

पुण्याहून ही लस महापालिकेच्या विशेष वाहनाने आणण्यात आली. मुंबई महापालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात, तर उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे येथे हा साठा पोहोचला आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस महापालिकेला उपलब्ध झाले असून, एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. तसेच ठाणे मंडळासाठी सुमारे 1 लाख 3 हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी 74 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील 29 निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल.

उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे हे ठाणे जिल्‍ह्यातील लसीकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

 

 

Tag- first-stock-of-covishield-vaccine-in-mumbai-thane

ML/KA/DSR/13 JANUARY 2021