पार्ल्यामध्ये भारतीय सेनेचे शस्त्रास्त्र प्रदर्शन, अजिबात चुकवू नका
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणामध्ये ६ आणि ७ एप्रिल २०२४ रोजी, भारतीय सैन्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे, एक अभूतपूर्व असे प्रदर्शन वीर सेनानी फाऊंडेशन आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. वीर सेनानी फाउंडेशन ही संस्था, भारतीय सैनिकांसाठी अनेक उपक्रम राबवीत असते. युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांच्या वीरपत्नींना, मुलांना भरघोस आर्थिक सहाय्य करीत असते. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असून यासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
विशेष कार्यक्रम —
शनिवार दिनांक ६ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ राष्ट्रीय सुरक्षा ‘या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये भारतीय संरक्षण खात्यातील अनेक आजी-माजी उच्च अधिकारी आणि युद्धशास्त्राचे नामवंत जाणकार भाग घेतील.
रविवार दिनांक ७ रोजी सायंकाळी ६ वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी संगीत दिलेल्या विविध गीतांचा,” स्वतंत्रते भगवती ” हा कार्यक्रम नामवंत गायक सादर करतील.
पार्ल्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी भरणारे हे बहुमोल शस्त्र प्रदर्शन अजिबात चुकवू नये असेच आहे ! येथे सामान्य नागरिकांना अनेक शस्त्रे स्वतः हातात घेऊन पाहता येतील. तेथे आपल्याला माहिती सांगणाऱ्या सैनिकांना, त्यांच्याबरोबर इतके नागरिक बोलतात, त्यांना सन्मान देतात हे खूप अभिमानास्पद वाटते.
उगवत्या पिढीला आपल्या शस्त्र सज्जतेची, आपल्या ताकदीची माहिती जर आपण दिली तर त्यांना राष्ट्राबद्दल अधिकच अभिमान वाटेल. म्हणूनच आपण हे प्रदर्शन अधिक मोठ्या संख्येने जरूर पाहावे,मुलांनाही जरूर दाखवावे ही विनंती.
निवडणूक आचारसंहितेमुळे, यात कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा सहभाग असणार नाही.
ML/ML/SL
4 April 2024