#डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावाला प्रतिनिधी सभेची मान्यता

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या प्रतिनिधी सभेने बुधवारी रात्री उशीरा अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोग प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रतिनिधी सभेमध्ये ट्रम्प यांच्या महाभियोग प्रस्तावावरील मतदानादरम्यान, समर्थनार्थ 232 मते (डेमोक्रॅट 222 + रिपब्लिकन 10) आणि विरोधात 197 मते पडली. मतदानानंतर ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील दोनदा महाभियोग चालविण्यात आलेले पहिले राष्ट्रपती बनले आहेत. कॅपिटल हिंसा प्रकरणात ट्रम्प यांच्याविरूद्ध हा महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव खासदार जेमी रस्किन, डेव्हिड सिसिलिने आणि टेड लियू यांनी तयार केला होता. प्रतिनिधी सभेतील 211 सदस्यांनी तो सह-प्रायोजित केला. प्रस्तावात मावळत्या राष्ट्रपतींवर, समर्थकांना देशद्रोहासाठी भडकावण्याचा आरोप करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटल इमारतीला (संसद परिसर) घेराव घालण्यास उद्युक्त केले, त्यावेळी त्याठिकाणी इलेक्टोरल कॉलेज ची मते मोजली जात होती आणि लोकांनी हल्ला केल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. या घटनेत एका पोलिस अधिकार्‍यासह पाच जणांचा मृत्यु झाला.

प्रतिनिधी सभेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सिनेटवर आहे. याठिकाणीही हा प्रस्ताव संमत झाला तर डोनाल्ड ट्रम्प यांना नियोजित वेळेपूर्वीच राष्ट्रपती पद सोडावे लागेल. परंतु सिनेटमध्ये रिपब्लिकन नेत्यांकडे 50 च्या तुलनेत 51 इतक्या कमी फरकाचे बहुमत आहे. सिनेटमध्ये महाभियोग प्रस्ताव संमत करण्यासाठी दोन तृतीय सदस्यांची मते आवश्यक असतात.

प्रतिनिधी सभेने 18 डिसेंबर 2019 ला देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोगाचा प्रस्ताव संमत केला होता, परंतु रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण असलेल्या सिनेटने फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना दोषमुक्त केले होते. त्या वेळी असा आरोप केला गेला होता की ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्रपतींवर जो बिडेन आणि त्यांच्या मुलाविरूद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला.

दुसरीकडे, कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्व समुह माध्यमांकडून बंदी घालण्यात आल्यानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य याआधी कधीही इतके धोक्यात आले नव्हते. ते म्हणाले की त्यांना 25 व्या दुरुस्तीपासून अजिबात धोका नाही, परंतु नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बिडेन आणि त्यांच्या प्रशासनाला यामुळे भविष्यात नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी सांगितले की देशाच्या इतिहासात जाणीवपूर्वक एखाद्याला (ट्रम्प) त्रास देण्याच्या निंदनीय कृत्याला प्रोत्साहन देऊन महाभियोगाचा उपयोग केला जात आहे आणि यामुळे प्रचंड संतापाची आणि विभाजनाची परिस्थिती निर्माण होत आहे. याचे दु:ख इतके जास्त आहे की काही लोकांना, विशेषकरुन जे अमेरिकेसाठी अत्यंत धोकादायक आहेत त्यांना ते समजू देखील शकत नाही.

 

Tag-Donald Trump/Impeachment/sanctioned
PL/KA/PL/14 JAN 2021