कच्च्या तेलाचे दर दोन वर्षातील विक्रमी उंचीवर

कच्च्या तेलाचे दर दोन वर्षातील विक्रमी उंचीपर्यंत पोहोचले

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जवळपास दोन वर्षांनंतर, जगातील तेलाचे दर (Crude Oil) आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत, त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात. तेल उत्पादक देशांचा समूह ओपेक (OPEC) आणि सहकारी देशाकडून होणारी उत्पादनातील कपात एप्रिलपर्यंत वाढवली जाणे हे त्यामागचे कारण असल्याचे मानले जात आहे.

ओपेक (OPEC) आणि त्याच्या सहकारी देशांनी तेल उत्पादनातील सध्याच्या कपातीच्या त्यांच्या पातळीत कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूड ची किंमत 4.2 टक्क्यांनी म्हणजेच 2.67 डॉलर प्रति बॅरलने वाढून 66.74 वर पोहोचली. अमेरिकेच्या बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, त्याठिकाणीही गुरुवारी कच्च्या तेलाचा वायदा भाव 5.6 टक्क्यांनी वाढून 64.70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला.

सौदी अरेबियाकडून दिलासा देण्यास नकार

जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक सौदी अरेबिया दररोज 10 लाख बॅरेलची कपात कमीतकमी एप्रिलपर्यंत सुरु ठेवेल. मात्र रशिया आणि कझाकिस्तान तेलाच्या उत्पादनात किंचित वाढ करू शकतात.

आगामी काळात प्रति बॅरल 10 डॉलर दरवाढीचा अंदाज

गेल्या महिन्यात गुंतवणूक बँक गोल्डमन सॅशने कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती वाढण्याची शक्यता वर्तविली होती. कारण कोरोना साथीमधून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर मागणी अचानक वाढली आहे, परंतु तेल उत्पादक गट ओपेक + (OPEC) आणि इराणकडून तेल उत्पादनात सातत्याने कपात सुरु आहे.

 

PL/KA/PL/6 MAR 2021