चीनमध्ये आता लग्नाविना मुले कायदेशीर

 चीनमध्ये आता लग्नाविना मुले कायदेशीर

बिजिंग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने लोकसंख्या नियंत्रणासाठी 1980 पासून एक मूल धोरण लागू केले होते. हे लागू करताना अनेकदा कठोर धोरणही अवलंबले होते. एकापेक्षा जास्त मूल झाल्यास नोकरीत पदोन्नती रोखणे आणि सामाजिक बहिष्कारच नव्हे तर अनेकदा दंड आणि शिक्षाही केली जात होती. याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत.2016 मध्ये सरकारने यात सूट देताना दोन मूल धोरण लागू केले. 2021 मध्ये ते तीन मूल धोरण करण्यात आले. मात्र असे असूनही 2022 मध्ये देशाची लोकसंख्या 60 वर्षांनंतर प्रथमच घटली.

2022 मध्ये चीनमध्ये पहिल्यांदाच 95.6 लाख बालकांचा जन्म झाला, तर 1.04 कोटी लोकांचा मृत्यू झाला. 1960 च्या दशकानंतर प्रथमच चीनमध्ये लोकसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. या आकड्यांनी चीन सरकारच्या यंत्रणेला एका नव्या चिंतेत ढकलले आहे. लोकसंख्या घटण्याची ही मालिका सुरूच राहिली तर मनुष्यबळावर आधारित असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट निर्माण होईल.

त्यामुळे लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन सरकार अनेक उपाययोजना करत आहे. या उपाययोजना चीनचा रूढीवादी समाज आणि कठोर नियमांच्या पूर्णपणे उलट आहेत. चीनच्या सिचुआन प्रांताने नियमांत बदल करत आता ज्यांचा विवाह झालेला नाही अशा जोडप्यांनाही मातृत्व रजा आणि वैद्यकीय खर्चाची सुविधा देणे सुरू केले आहे. म्हणजेच आता सिचुआनमध्ये अविवाहित मातांनाही विवाहित जोडप्यांप्रमाणे सरकारी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

सिचुआनमध्ये अविवाहित मातांनाही ही सूट असेल की त्या आता जन्म नोंदणी करतील आणि सरकारी सुविधा घेतील. आतापर्यंत अविवाहित मातांना चीनमध्ये सन्मान मिळत नव्हता. चीनमध्ये अविवाहित मातांना आतापर्यंत सन्मानाने बघितले जात नव्हते. सिचुआनच्या या पावलानंतर अनेक ऑनलाईन फोरम्सवर याचे कौतुक करण्यात आले आहे.

डेमोग्राफी तज्ज्ञांचे मानणे आहे की घटत्या लोकसंख्येवर चीनची चिंता रास्त आहे, मात्र यात सुधारणेसाठी केवळ कॅश इन्सेंटिव्हसारखे उपाय पुरेसे होणार नाही. चीनने दीर्घकाळ लोकसंख्या नियंत्रणाच्या कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आता याचा परिणाम असा झाला आहे की समाजाची विचारसरणी बदलली आहे. सोबतच आर्थिक स्थितीनुसार लोकांनी कुटुंब नियोजनाला जीवनाचा भाग बनवले आहे.आता लोकांची विचारसरणी बदलण्यासाठी केवळ सरकारी धोरणांतच नव्हे, सामाजिक संस्थांमध्येही बदल करणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान वास्तविक, चीनमध्ये लोक मूल जन्माला न घालण्याचे मुख्य कारण महागाई आहे. गेल्या वर्षी 18 ते 25 वर्षे वयाच्या 20 हजार लोकांचा एक सर्व्हे करण्यात आला. यापैकी दोन तृतीयाश तरुणांनी सांगितले की त्यांना मूल जन्माला घालायची इच्छा नाही. मूल जन्माला घालण्यापासून ते त्याच्या संगोपनाचा खर्च खूप जास्त आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती आधीच वाईट आहे. अनेक युवकांचा रोजगार हिरावला आहे. यामुळे कुटुंब वाढवण्यास ते प्राधान्य देत नाही.
SL/KA/SL
27 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *