भाजपचे ४०० पारचे स्वप्न भंगले, हाच मोदींचा पराभव

मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा सत्तेत येऊ, असे म्हटले होते. पण, जनतेने सत्ताधाऱ्यांचा ४०० पार चे स्वप्नभंग केले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला. महेश तपासे म्हणाले की, ४०० पारचा नारा देणाऱ्यांना २५० जागाही मिळाल्या नाहीत. भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून आता मोदी सरकार ऐवजी एनडीए सरकार असा उल्लेख करणे सुरू झाले आहे.
देशातील बेरोजगार तरुण, शेतकरी व संविधान मांणाऱ्या नागरिकांनी भाजपाला त्याची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रात भाजप ४५ पार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनाच स्वतःचा राजीनामा पुढे करण्याची वेळ आली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही, महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले हे लक्षात आल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी खेळी सुरू केली आहे.
वास्तविक भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्यायचा आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता येत नाही हे फडणवीस यांच्या लक्षात आल्यामुळे मीच राजीनामा देतो असे राजीनामा नाट्य फडणवीस यांनी सुरू करून शिंदे व पवार यांच्यावर नैतिक दडपण आणण्याचा डाव टाकला असेही महेश तपासे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे अजित पवार यांच्या उमेदवारांना जागा देण्यापेक्षा स्वबळावर लढावे असा विचार फडणवीस यांना येत असावा असेही तपासे म्हणाले.
शरद पवार साहेबांचा कार्यकाळ संपला व त्यांनी घरी बसून कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावे असे विधान करणारे अजित पवारांचा आवाज मतदारांनी बंद केला आहे. एकीकडे ४० आमदार सोबत असूनही एकच खासदार निवडून येतो तर दुसरीकडे ८४ वर्षाच्या योद्धाचा स्ट्राईक रेट हा ८०% आहे कारण बाप तो बाप होता है पंगा नही लेना असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
SW/ML/SL
5 June 2024