#अजित डोवाल यांचा अचानक काबुल दौरा

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अफगाणिस्तानात सुरू असलेली शांतता चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असतानाच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल बुधवारी अचानक काबूलमध्ये दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले. त्यांच्यासमवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे. त्यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी तेथील परिस्थिती, परस्पर सामरिक हितसंबंध, दहशतवादाविरूद्धच्या लढाईत सहकार्य आणि अफगाणिस्तानात शांतता प्रक्रिया प्रस्थापित करणे याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

अफगाणच्या राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीत असे सांगण्यात आले आहे की दहशतवादाविरोधी लढाईत सहकार्य अधिक बळकट करणे आणि अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक एकमत होणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तालिबान बंदीसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्षपद भारताला देण्यात आले असल्याने डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. दरम्यान शांतता चर्चा पुढे नेण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी डोवाल यांना सांगितले आहे की नाटो आणि अमेरिकेसमवेत एकत्र येऊन अफगाणिस्तान आणि भारत दहशतवादाविरूद्ध अधिक यश मिळवू शकतात.

डोवाल यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहीब यांचीही भेट घेतली. त्यानंतर डोवाल यांनी अफगाणिस्तानातील हाय काउन्सिल फॉर द नॅशनल रिकन्सिलिएशनचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. नंतर डॉ अब्दुल्ला यांनी सांगितले की शांतता चर्चेबरोबरच डोवाल यांच्यासोबत अफगाणिस्तानात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या भूमिकेवर चर्चा झाली.

Tag-Ajit Doval/Kabul/peace meet
PL/KA/PL/14 JAN 2021