भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असून, १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होणार आहेत. संजीव खन्ना यांची जानेवारी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. सेवा ज्येष्ठतेनुसार २४ ऑक्टोबर रोजी तत्कालिन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती.
१३ वर्षं दिल्ली उच्च न्यायालयात सेवा दिल्यानंतर १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करताना या काळात त्यांनी १७ जून ते २५ डिसेंबर २०२३ दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या विधिविषयक समितीचे चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सरन्यायाधीशपदासोबतच आता न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याकडे नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे कार्यकारी प्रमुख व भोपाळमधील नॅशनल ज्युडिशियल अकॅडेमीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य या अतिरिक्त जबाबदाऱ्यादेखील आहेत.
SL/ML/SL
11 Nov. 2024