भांडवली बाजाराचा (Stock Market) विक्रमी आठवडा.

भांडवली बाजाराचा (Stock Market) विक्रमी आठवडा.

मुंबई , दि. 3 (जितेश सावंत): भारतीय भांडवली बाजाराने सलग दुस-या आठवड्यात वाढीचा वेग कायम ठेवला व 2 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात नवीन विक्रमी उच्चांक गाठला.जागतिक महागाई कमी होणे,चीन मधील निर्बंध हटवून पुन्हा झालेली सुरुवात,अमेरिकन डॉलरची घसरण, क्रूड आणि वस्तूंच्या (कमोडिटी) किमतीतील घट, तसेच FIIची मजबूत खरेदी यामुळे या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी शिखरे गाठली. यूएस फेडच्या डिसेंबरच्या चलनविषयक धोरणात व्याजदरात कमी वाढ होण्याच्या संकेतानेही गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 63,583.07 आणि 18,887.60 हा आजीवन उच्चांक गाठला. येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून RBI च्या बैठकीकडे असेल ,७ डिसेंबर रोजी व्याजदरा संबंधीचा निर्णय तसेच ९ डिसेंबर रोजी जाहीर होणार चीनचा CPI/PPI data व ९ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या PPI data कडे असेल.

सोमवारी ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी गुजरात निवडणुकीचे एक्सिट पोल जाहीर होतील याकडे देखील बाजाराचे लक्ष राहील.
गेल्या काही दिवसात बाजारात मोठी वाढ झाली आहे , मार्केट ओव्हरबॉट झोन मध्ये असल्याने काही प्रमाणात नफावसुली होऊ शकते त्यामुळे गुंतवणूकदारानी सावध राहावे.
Technical view on nifty- निफ्टीने शुक्रवारी 18696 चा बंद दिला आहे.निफ्टीला वर जाण्याकरिता 18752,18782,18812 हे टप्पे पार करावयास लागतील हे स्तर पार केल्यास निफ्टी नवे विक्रमी शिखर गाठू शकेल तसेच जर निफ्टीने 18616 चा स्तर तोडला तर निफ्टीत घसरण होऊन निफ्टी 18552,18484,18445 ह्या स्तरांना स्पर्श करेल.
सेन्सेक्स, निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. Sensex, Nifty hit record highs

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अस्थिर सत्रानंतर देशांतर्गत बाजार किरकोळ वाढीसह संपले.चीनमध्ये सुरू असलेल्या शून्य-कोविड धोरणामुलळे निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आशियाई समभागांची घसरण झाली.रविवारी शांघायमध्ये निदर्शक आणि पोलिसांच्या चकमकीनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी भीती निर्माण झाली. शांघायसह प्रमुख चीनी शहरांमध्ये हजारो निदर्शकांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना राजीनामा देण्याची मागणी केली.
भारतीय बाजाराची देखील सुरुवात नकारात्मक झाली. परंतु कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आज विक्रमी उच्चांक गाठला.दिवसभरात सेन्सेक्स 62,701.4 या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. निफ्टीला नवीन उच्चांक गाठायला १३ महिने लागले. सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी होती.आयटी, बँका आणि वित्तीय समभागांना मागणी होती. मात्र, धातू,रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागात घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 211.अंकांनी वधारून 62,504 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 50 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,562 चा बंद दिला.

सेन्सेक्स, निफ्टीने पुन्हा नवा उच्चांक गाठला.Sensex, Nifty hit new highs again
मंगळवारी भारतीय भांडवली बाजाराने सलग सहाव्या सत्रात त्याची विजयी घोडदौड सुरू ठेवली व फार्मा, धातू आणि FMCG मधील खरेदीमुळे पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला.सपाट सुरुवातीनंतर, बाजाराने वेग घेतला आणि नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला परंतु शेवटच्या तासात नफावसुलीमुळे दिवसभरातील काही नफा पुसला गेला. दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 62,887.40 आणि 18,678.10 या त्यांच्या ताज्या विक्रमी उच्चांकांना स्पर्श केला, परंतु ते त्यांना टिकवून ठेवू शकले नाहीत. तेलाने नीचांकी पातळी गाठल्याने बीएसई सेन्सेक्स आज जवळजवळ 62,900 वर पोहोचला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 77अंकांनी वधारून 62,681वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 55 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,618 चा बंद दिला.

सेन्सेक्सने ६३,००० चा टप्पा पार केला.
सलग सातव्या दिवशी भारतीय बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला.मजबूत सुरुवातीनंतर, बाजार सकाळच्या सत्रात सपाट राहिला परंतु शेवटच्या तासाच्या खरेदीने निर्देशांकांना नवीन टप्पे पार करण्यास मदत केली, सेन्सेक्सने 63,303.01 आणि निफ्टीने 18,800 पार करून प्रथमच 18,816.05 ला स्पर्श केला.PSU बँका वगळता सर्व क्षेत्रात खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 417अंकांनी वधारून 63,099 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 140 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,758 चा बंद दिला.
निफ्टी १८,८०० च्या वर. Nifty above 18,800
बाजाराने डिसेंबरची सुरुवात मजबूत नोटवर केली.सकाळच्या सत्रात बाजाराने तेजी कायम राखण्यात यश मिळवले परंतु दुपारी वरच्या स्तरावर गुंतवणूकदारानी नफा वसुलीला प्राधान्य दिले.बाजाराने सकारात्मक बंद दिला. तथापि गुरुवारी भारतीय इक्विटी बेंचमार्कने सलग आठव्या सत्रात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सेंट्रल बँक डिसेंबरपासून लवकरात लवकर व्याजदर वाढीची गती कमी करू शकते.असे संकेत दिल्याने बाजारात जोश भरला.निफ्टीने 18887.60 व सेन्सेक्सने 63583.07 हे विक्रमी स्तर गाठले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 184अंकांनी वधारून 63,284.वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 54 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,812 चा बंद दिला.

सलग आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सलग आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.अमेरिकन बाजाराचा संमिश्र बंद व कमकुवत आशियाई बाजाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली आणि जसजसा दिवस पुढे सरकत असताना विक्री वाढली परंतु खालच्या पातळीवर खरेदी झाल्याने दिवसाचे काही नुकसान कमी होण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 415 अंकांनी घसरून 62,868..वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 116 अंकांची घट होऊन निफ्टीने18,696 चा बंद दिला.
(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )

[email protected]

ML/KA/PGB
3 Dec .2022