पीएम केअर विश्वस्तपदी ‘या’ प्रसिद्ध व्यक्तींची नियुक्ती

नवी दिल्ली : आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधीच्या (पीएम केअर्स फंड) विश्वस्तपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी पंतप्रधान कार्यालयातर्फे प्रसिद्ध झालेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. PM Cares Funds. Newly appointed Trustee.

पंतप्रधानांनी बुधवारी नवनियुक्त विश्वस्त मंडळासह बैठक घेतली. या बैठकीत भारताचे माजी नियंत्रक व महालेखापाल (CAG) राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडी कॉर्प आणि पिरामल फाउंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांना ‘पीएम केअर्स फंड’च्या सल्लागार मंडळात नियुक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

२०२०-२१ मध्ये या फंडात दहा हजार ९९० कोटी रुपये जमा झाले. या निधीतून एक हजार कोटी स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी खर्च करण्यात आले. एक हजार ३९२ कोटींची मदत करोनाप्रतिबंधक लसनिर्मितीसाठी देण्यात आली. ‘पीएम केअर’ निधीतून देशातील सर्व जिल्ह्यांत प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. ‘पीएम केअर’ स्थापण्यात आल्यानंतर मोठय़ा संख्येने नागरिक, संस्था आणि सरकारी संस्थांनीही यात भरीव योगदान दिले आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत करोनामुळे आपले आई-वडील गमावलेल्या चार हजार ३४५ मुलांना मदत करण्यासाठी ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ या उपक्रमासह ‘पीएम केअर’द्वारे घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सादरीकरण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या निधीत भरघोस मदत दिल्याबद्दल देशवासीयांना धन्यवाद दिले.

SL/KA/SL

22 Sep. 2022