कास पठाराचे पर्यटन आता पर्यावरणपूरक

मुंबई,दि.२२  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ – ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. Kas plateau tourism is now eco-friendly

तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्युईंग गॅलरी) सुरू करणे,स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे,सुरक्षा वाढविणे तसेच,घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्रालयातून मंत्री लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे,ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,खासदार श्रीकांत शिंदे,आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,सरपंच यांचे आभार मानले.कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव नितीन करीर,पर्यटन संचालक मिलींद बोरीकर,सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले,जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की,पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेले कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल.

ML/KA/SL

22 Sep. 2022