आझादी गौरव पदयात्रेला राज्यात प्रारंभ

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या आंदोलनात भाग घेतला नाही. जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरोधात लढत होता ते जे लोक इंग्रजाच्या बाजूने लढत होते आज देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना राष्ट्रभक्तीचा उमाळा आला आहे परंतु त्यांचे हे राष्ट्रप्रेम बेगडी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.Azadi Gaurav Padayatra begins in the state

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आझादी गौरव पदयात्रेत सेवाग्राम येथे सहभाग घेतला, त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्यांशी संबंधित कोणताही पक्ष वा संघटना यांनी सहभाग घेतला नाही. देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला होता. महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा नारा दिला होता त्यावेळी इंग्रजांनी गांधींची, पंडीत नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. पण देशातील सामान्य जनतेने हे आंदोलन हाती घेतले. अरुणा असफ अली या तरूणीने ऑगस्ट क्रांती मौदानात तिंरगा फडकवला. काँग्रेस पक्षाचे लाखो कार्यकर्ते चले जावो आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेस पक्षाचे या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. तिरंग्याखाली देश एक झाला असताना भाजपाची मातृसंस्था आरएसएस यापासून दूर राहिली. आज देशाचा जीडीपी घसरला आहे पण तो सावरण्याऐवजी डीपी बदलण्याला मोदी सरकार प्राधान्य देत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सोवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाग्राम येथून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चंदोरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ML/KA/PGB
9 Aug 2022