शेकडो हेक्टर वरील संत्राबागांना मोठ्या प्रमाणात गळती..

अमरावती, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा, अंजनगाव सुर्जी हे तालुके संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. वरुड मोर्शी भागात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाते.
मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी कधी अवकाळी पाऊस, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणूकीला बळी पडत आहे.यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर वरील संत्राबागांना गळती लागल्याने व समाधानकारक भाव न मिळत असल्याने संत्रा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी मृग आणि आंबिया बहार पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. मात्र यावर्षी सततच्या पावसामुळे संत्रा बागावर बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे संत्रा बागांना गळती लागली आहे.Hundreds of hectares of orchards are flooded.
मागील वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली होती तसेच कोरोनामुळे अनेक ठिकाणी मार्केट बंद असल्यामुळे भाव सुद्धा पडलेले होते. त्यामुळे हे सलग चवथे वर्ष आहे. यावर्षी संत्रा पीक चांगले होते. अतिवृष्टीमुळे हाती आलेले संत्र्याचे पीक गळून पडले आहे.
संत्र्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. काही शेतकऱ्यांचा विकलेला संत्रा व्यापाऱ्यांनी सोडून देऊन पळ काढला आहे.
त्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे.शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये मशागतीसाठी लावलेले पैसे सुद्धा आता निघू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या भागातील संत्रा हे मुख्य पीक आहे त्यामुळे या पिकाने धोका दिला त्यामुळे पिकावर घेतलेले बँकांचे लाखो रुपयाचे कर्ज कसे फेडायचे व दैनंदिन जीवनातील लागणारा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. संत्रा लहान्याची मोठी करेपर्यंत खूप सारा खर्च करावा लागतो.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर येथे संत्रा संशोधन केंद्र सुद्धा आहे त्यांनी येथे संत्रा बागांमध्ये भेट देऊन कशामुळे ही गळण झाली आहे. याबाबत संशोधन करून त्यावर उपाय शोधून शेतकऱ्यांना सांगावे.तसेच नवनवीन येणारे रोग, त्यावरील औषधी,वाण, कलम शोधून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे.
दरवर्षी असेच अस्मानी सुलतानी संकट आले तर शेतकऱ्यांना शेती करणेच अवघड होईल.त्यामुळे राज्य शासनाने गळती झालेल्या संत्राबागांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ML/KA/PGB
19 Oct 2021