हरिद्वार-कुंभमेळ्यात येणाऱ्या श्रद्धाळूंना करावी लागणार नोंदणी

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना नोंदणीनंतरच कुंभमेळा क्षेत्रात प्रवेश करता येईल.

हरिद्वार, दि.1 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना नोंदणीनंतरच कुंभमेळा क्षेत्रात प्रवेश करता येईल. आजमितीस कुंभमेळा प्रशासन नोंदणी तपासत आहेत किंवा नोंदणी क्रमांक नोंदवून घेत आहेत. बस अथवा रेल्वेने येणाऱ्या कुंभ यात्रेकरूंना प्रवास सुरु करण्याच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल.
कोविड -19 च्या  पार्श्वभूमीवर बुधवारी कुंभमेळा नियंत्रण भवनात कुंभ आयोजनाबाबत कुंभमेळा अधिकारी दीपक रावत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कुंभासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या संदर्भात बैठकीत झालेल्या चर्चेत असे ठरले कि जो कोणी कुंभमेळा क्षेत्रात प्रवेश करेल तो नोंदणी करूनच येईल. मास्क मोफत उपलब्ध करून देण्याविषयी सुद्धा बैठकीत चर्चा झाली. मास्क लावल्याशिवाय कोणीही घाटावर स्नान करणार नाही असे बैठकीत ठरले. दुकानदारांना सुद्धा कोविड -19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल तसेच त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांची क्षमता, नवीन रुग्णालयांची निर्मिती कोठे कोठे होणार आहे, सद्यस्थितीत उपलब्ध खाटा, कोणकोणत्या क्षेत्रात धर्मशाळा तसेच हॉटेलची व्यवस्था करायची आहे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. अतिक्रमणाविषयी बोलताना जिल्हाधिकारी सी रविशंकर यांनी सांगितले कि सध्यातरी अतिक्रमण झाल्याचे ऐकिवात नाही मात्र जर कोठेही अतिक्रमण झाले असेल तर त्याची यादी प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. खडखडी स्मशान क्षेत्राचा पूल लवकर सुरु करून चंडी पूल दुहेरी मार्गिकेत सुरु करण्याविषयी मेळा अधिकारी दीपक रावत यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक संथिल अबुदाई कृष्णराज एस, वरिष्ठ मेळा अधिकारी ललित नारायण मिश्रा आणि रामजी शरण शर्मा, शहर पोलीस अधीक्षक कमलेश उपाध्याय, पोलीस अधीक्षक मनीषा, मेळ्याचे आरोग्य अधिकारी अर्जुनसिंग सेंगर, कुंभमेळ्याचे विशेष अधिकारी महेश चंद्र शर्मा आणि संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीत सहभागी होते.
पार्किंगसंदर्भात कुंभमेळ्याचे महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी सप्टेंबर सप्त ऋषि आरटीओ चौकाजवळील चिन्हांकित पार्किंगची जागा 14 जानेवारीपूर्वी सपाट करण्यास सांगितले. बैठकीत कणखल, मायापुर, जगजितपूर, बैरागी, दक्षदीप, गौरीशंकर, रोडीवाला, लालजीवाला, पंतदीप, भीमगौडा, सप्त सरोवर, राणीपूर इत्यादी पार्किंगच्या जागांबाबत सविस्तर चर्चा झाली.
Tag-Haridwar-Registration mandatory for devotees
DSR/KA/DSR/1 JANUARY 2020