मंगळ मोहिम: फेब्रुवारी महिन्यात मंगळावर होणार वाहतूक कोंडी

मंगळ मोहिम: फेब्रुवारी महिन्यात मंगळावर होणार वाहतूक कोंडी

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): याच महिन्यात तीन देशांच्या मंगळ मोहीमा (Mars Mission) लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करत आहेत. हे तीन देश आहेत- संयुक्त अरब अमिराती (UAE), चीन (China) आणि अमेरिका (America). या तिन्ही देशांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये वेगवेगळ्या मोहिमा पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ग्रहाच्या दिशेने रवाना केल्या होत्या. यापैकी संयुक्त अरब अमिरातीचे मंगळ यान मंगळवारीच लाल ग्रहाच्या कक्षेत दाखल झाले आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी चीनची मोहिम देखील दाखल होणार आहे.

युएईची मंगळ मोहिम: होप

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मंगळ मोहिमेचे (Mars Mission) नाव आहे ‘होप’ (Hope), जे 20 जुलै, 2020 मध्ये जपानमधील तनेगाशिमा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. होप या नावावरुनच युएईला या मोहिमेकडून जास्त अपेक्षा आहेत हे स्पष्ट होते. ‘होप’ ही अरब देशांची पहिली अंतराळ मोहीम आहे. शास्त्रज्ञांना मंगळाच्या वातावरणाविषयी ठोस माहिती उपलब्ध करुन देणे हे त्याचे लक्ष्य आहे. मंगळवारी 9 फेब्रुवारी 2021 लाच ‘होप’ ने मंगळाच्या कक्षामध्ये प्रवेश केला आहे.

चीनची मंगळ मोहीम: तियानवेन -1

मंगळाच्या कक्षामध्ये प्रवेश करणारे दुसरे अभियान चीनचे तियानवेन -1 आहे. चिनी भाषेत तियानवेन याचा अर्थ – स्वर्गातून प्रश्न. त्यांची देखील ही पहिलीच स्वतंत्र मंगळ मोहीम (Mars Mission) आहे. यूएईच्या मोहिमेनंतर तीन दिवसानंतर म्हणजेच 23 जुलै 2020 ला हेनान प्रांतातील वेनचेंग अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून ते प्रक्षेपित करण्यात आले होते. तियानवेन -1 देखील याच आठवड्यात मंगळाच्या कक्षेत पोहोचण्याची शक्यता आहे. चीनची मंगळ मोहिमही लाल ग्रहाच्या (Red Planet) वातावरणाचा शोध घेईल. परंतू, या मोहिमेचा मुख्य भाग मे महिन्यात पूर्ण होणार आहे, ज्यात त्याचे रोव्हर (Rover) मंगळाच्या दक्षिणेकडील भागात किंवा यूटोपिया प्लॅनिटियाच्या पृष्ठभागावर हळुवार उतरवण्याची योजना आहे. चीनची ही मोहिम चीनच्या भावी योजनेवर आधारित आहे, जेणेकरून ते मंगळावरुन खडक व माती पृथ्वीवर आणू शकतील.

अमेरिकेची मंगळ मोहीम: पर्सिव्हरन्स

ही सर्वात नवी मोहीम आहे, ज्याने पृथ्वीवरील पहिले मंगळ हेलिकॉप्टर- इंजेन्युटी देखील आपल्यासोबत नेले आहे. भविष्यात दुसर्‍या ग्रहावर मानवाला उतरवण्याची शक्यता तपासून पहाणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. अमेरिकेच्या मंगळ मोहिमेसंदर्भात युएई आणि चीनमधील वैज्ञानिकांएवढेच नासाचे वैज्ञानिकही तणावाखाली आहेत. त्याचे रोव्हर 18 फेब्रुवारीला मंगळावरच्या जेजिरो क्रेटर नावाच्या जागी उतरण्याची शक्यता आहे. ‘पर्सिव्हरन्स’ प्रति तास 20,000 किलोमीटर वेगाने मंगळाच्या वातावरणात खाली उतरण्यास सुरवात होईल आणि त्याचा वेग पॅराशूटच्या सहाय्याने 3.2 किलोमीटर वेगापर्यंत कमी केला जाईल. त्यानंतर रोव्हरला एका मोठ्या स्काय क्रेनच्या मदतीने मंगळ पृष्ठभागावर हळूवारपणे सहा पायांवर खाली उतरवले जाईल.

PL/KA/PL/10 FEB 2021