‘वंदे मातरम’ साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

 ‘वंदे मातरम’ साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली, दि. ११ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम्’ या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये १५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व शासकीय कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ वाजवणे बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम्’ सादर केले जाईल. तसेच गीत वाजवताना उपस्थित नागरिकांनी आदराने उभे राहणे अनिवार्य असेल.

राष्ट्रपती उपस्थित असलेल्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये, तसेच पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान सोहळ्यांमध्येही ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतापूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या आगमन आणि प्रस्थानावेळीही हे गीत वाजवले जाणार आहे.

माहितीनुसार, ३ मिनिटे १० सेकंदांच्या ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. १९३७ मध्ये काँग्रेसने वगळलेली चार कडवीही यामध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्या कडव्यांमध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा उल्लेख आहे.
‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा’ (Prevention of Insults to National Honour Act) या कायद्याचा विस्तार करून ‘वंदे मातरम्’लाही त्यात समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. या कायद्यानुसार राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास किंवा इतरांना आदर व्यक्त करण्यापासून रोखल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीला केंद्र सरकारकडून याबाबत नियमावली देण्यात आली होती. त्यामध्ये कोणत्या कार्यक्रमांत’वंदे मातरम्’ बंधनकारक असेल, हे सांगण्यात आले आहे. नियमावलीनुसार, चित्रपटगृहांमध्ये ‘वंदे मातरम्’ वाजवणे तसेच चित्रपट सुरू होण्याआधी उभे राहणे अनिवार्य असणार नाही. जर एखाद्या चित्रपटात ‘वंदे मातरम्’ गीत दाखवले गेले, तर प्रेक्षकांनी उभे राहण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले आहे. चित्रपटगृहात अचानक उभे राहिल्यास गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळे गीताचा योग्य सन्मान राखला जाणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *