उपनगरी मार्गावर लवकरच वंदे मेट्रो एसी लोकल
मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाववरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी लवकरच आधुनिक वंदे मेट्रो एसी लोकल धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने अत्याधुनिक लोकल गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 238 नवीन रेक्स तयार करण्याची योजना आहे. या गाड्या विशेष डिझाईन, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवास लक्षात घेऊन तयार केल्या जाणार आहेत.
एमयूटीपी फेज 3 आणि 3A अंतर्गत तब्बल 2856 नवीन डबे प्रवासी सेवेत आणले जाणार आहेत. यासोबत पुढील 35 वर्षे देखभाल व्यवस्था निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे सेवा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल आणि ट्रेनची गुणवत्ता कायम राखली जाईल.
विशेष सुविधा
या वंदे मेट्रो लोकलमध्ये इंटर-कार गॅंगवे असल्याने एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येईल. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन करता येईल. उभे राहण्यासाठी अधिक मोकळी जागा, आरामदायी कुशन सीट्स आणि दिव्यांग तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी राखीव जागा देण्यात येणार आहे. ट्रेनमध्ये मोठ्या काचा असलेल्या खिडक्या असतील. त्यामुळे प्रवाशांना बाहेरील परिसर स्पष्ट दिसेल आणि बंदिस्तपणाची भावना कमी होईल.
मुंबई रेल्वे विकास महामंडळानुसार (एमआरव्हीसी), कंत्राट मंजूर झाल्यानंतर अडीच वर्षांत पहिल्या प्रोटोटाइप गाड्या मिळण्याची अपेक्षा आहे. या गाड्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर चार ते सहा वर्षांच्या कालावधीत सर्व गाड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २,८५६ वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी व देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यातील प्रत्येक गाडी १२ डब्यांची असेल. हा ताफा सुरुवातीला १२ आणि १५ डब्यांच्या रचनेत धावेल, तर भविष्यात १८ डब्यांच्या गाड्यांची तरतूदही करण्यात आली आहे.
मुंबईच्या गर्दीच्या नेटवर्कसाठी भावी पिढीतील या गाड्या तयार केल्या जात आहेत. १३० किमी प्रतितास कमाल वेगाची क्षमतेमुळे वेळापत्रक पाळणे सुलभ होईल. अत्याधुनिक ट्रॅक्शन तंत्रज्ञानामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढेल व कार्बन फूटप्रिंट कमी होईल. एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शनमुळे जास्त वेगातही प्रवास अधिक सहज व आरामदायी राहील. डिजिटल पॅसेंजर इकोसिस्टममध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेनमेंट, वाय-फाय, प्रवासी माहिती प्रणाली आणि प्रत्यक्ष वेळेतील मार्गदर्शनासाठी डायनॅमिक रूट मॅप्स असतील.
SL/ML/SL